नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहानंतर सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शन सोहळ्याची चर्चा ठरली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, सोनिया गांधी, राहुल गांधींसह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतीली निवासस्थानी हा स्वागत समारंभाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. रेवती आणि सारंग यांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्यानिमित्ताने (Wedding Reception) शरद पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले होते. विशेषत: पवार कुटुंबातील तरुण पिढीचा या सोहळ्यातील वावर विशेष नजरेत भरणारा होता, मात्र, रेवती आणि सारंग यांच्या रिसेप्शनला घरातील एका सदस्याच्या अनुपस्थितीने विविध चर्चांना उधाण आले आहे. रेवती सुळेच्या रिसेप्शनला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार न आल्याने सर्वांच्याच भोवया उंचावल्या.
सुनेत्रा पवार जरी रेवतीच्या रिसेप्शनला गैरहजर होत्या तरीही पार्थ पवार आणि जय पवार यांनी या रिसेप्शनला हजेरी लावली. अजित पवारांचे दोन्ही लेक या रिसेप्शनला हजर होते. ज्यामुळे आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. मात्र, सुनेत्रा पवार या रिसेप्शनला नक्की का गैरहजर होत्या, याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही.
रेवतीच्या रिसेप्शननिमित्त पूर्ण पवार कुटुंब एकत्र होते. मात्र, त्याला अपवाद ठरल्या त्या म्हणजे सुनेत्रा पवार. जवळपास पवार कुटुंबातील सदस्य या रिसेप्शनला हजर होते. अमित शाह देखील बऱ्याचवेळ येथे उपस्थित होते. शरद पवार आणि सुळे कुटुंबासोबत गप्पा मारताना अमित शाह दिसले. शरद पवार यांच्या शेजारी अमित शाह बसले होते.
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शाह आणि राहुल गांधी एकाच ठिकाणी आलेले पाहायला मिळाले. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर जात असताना दोन्ही नेते एकाच ठिकाणी उभे होते. त्यानंतर अमित शाह स्टेजवर गेले. या घटनेचाही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भाजपावर आणि केंद्र सरकारवर खरपूस टीका करणारे आमदार रोहित पवार या समारंभात पंतप्रधान मोदींशी हितगुज साधताना दिसून आले. पवार कुटुंबातील सदस्यांची पंतप्रधान मोदींशी भेट घालून देण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि रोहित पवार यांच्यात काही वेळ संवाद झाला. यावेळी युगेंद्र पवार आणि त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंबातील सदस्यांची ओळख करून दिली.




