अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सुपा, पारनेर, बेलवंडी व एमआयडीसी हद्दीत दरोड्याचे गुन्हे करणारी टोळी निष्पन्न करून दोन जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सिध्देश सादीश काळे (वय 22, रा. वाळुंज पारगाव, ता. नगर) आणि श्रीहरी हरदास चव्हाण (वय 25, रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, त्यांनी चोरीचे सोन्याचे दागिने काजल अजय भोसले (रा. वाळुंज ता. नगर) हिला विक्री केले असल्याची कबूली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. 25 जानेवारी रोजी पहाटे दोनच्या सुमारास योगेश खंडू शेरकर (रा. सोबलेवाडी, पठार वस्ती, ता. पारनेर) यांच्या राहते घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून त्यांना व त्यांच्या आईला मारहाण केली.
घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व दुचाकी चोरली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक स्थापन केले गेले. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपींचा शोध घेतला आणि गुप्त माहितीच्या आधारावर पारनेर ते कान्हुर पठार रस्त्यावर सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. पथकाने त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर पारनेर, भिंगार कॅम्प, सुपा, बेलवंडी, एमआयडीसी या पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सहा गुन्ह्यांची कबूली त्यांनी दिली. ते गुन्हे उघडकीस आले आहे.
निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रवींद्र घुंगासे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, महादेव भांड यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.