अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कामरगाव (ता. अहिल्यानगर) शिवारात पहाटेच्या सुमारास कार चालकाला कोयत्यांचा धाक दाखवून मारहाण करत जबरी चोरी करणार्या टोळीतील तिघांना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले असून एक संशयित पसार आहे. या कारवाईत 89 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बाळासाहेब काशिनाथ कदम (रा. कोथरूळ, ता. माजलगाव, जि. बीड) हे त्यांचे साथीदार पंकज श्रीराम कदम यांच्यासह कारने पुण्याकडे जात होते. त्यांना रविवारी (22 फेब्रुवारी) पहाटे कामरगाव शिवारात चौघांनी कोयत्यांचा धाक दाखवून मारहाण केली. जबरदस्तीने त्यांना त्यांच्या कारमध्ये बसविण्यात आले. नगरकडे नेत असताना कार व एका लक्झरी वाहनाचा अपघात झाला. या घटनेत संशयित आरोपींनी बाळासाहेब व पंकज यांच्याकडून एक लाख 15 हजार रूपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला.
या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, अंमलदार दत्तात्रय हिंगडे, नितीन शिंदे, सुभाष थोरात, मंगेश खरमाळे, विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपींचा माग काढला. त्यानुसार तुषार विजय उमाप, बुध्दभूषण संतोष आंग्रे (दोघे रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर) व तेजस लक्ष्मण उगलमुगले (रा. नवनागापूर, अहिल्यानगर) यांना दैठणे गुंजाळ येथून ताब्यात घेत अटक केली. चौथा संशयित भोर्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) हा पसार आहे.
आणखी दोन गुन्ह्यांची कबूली
संशयित आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी चास घाटात एका कुटुंबाचे बंद पडलेले वाहन पाहून मारहाण करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे लुटल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच चास शिवारात पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री तिघांना गजाचा धाक दाखवून सोन्याची चैन व मोबाईल लुटल्याचेही समोर आले आहे. यामुळे दोन गुन्हे उघडकीस आले आहे.




