अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तालुक्यातील मदडगाव शिवारात दरोड्याची तयारी करणार्या दरोडेखोरांच्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतले असून तिघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून तलवार, सत्तूर, लोखंडी कटावणी, मिरचीपूड तसेच मोबाईल असा सुमारे 37 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दरोडा, घरफोडी व रोड रॉबरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला नियमित गस्त करून गुन्हे रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, लक्ष्मण खोकले, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड व सुनील मालणकर यांचे पथक दरोडा प्रतिबंधक गस्त करत होते. दरम्यान, मंगळवारी (10 मार्च) गस्तीदरम्यान पथकाला माहिती मिळाली की, सहा ते सात इसम दोन दुचाकीवर येऊन मदडगाव शिवारातील टाकळी काझी ते अंमळनेर रस्त्यावर पाण्याच्या टाकीजवळ थांबले असून सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अंधारात दबा धरून बसलेल्या संशयितांवर छापा टाकला.
या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले, तर अन्य तीन अंधाराचा फायदा घेत पळून गेले. छगन चिंतामण काळे (वय 43, रा. तळेवस्ती कडा, ता. आष्टी, जि. बीड), महावीर पंढरीनाथ भोसले (वय 39, रा. शेरी खुर्द, ता. आष्टी, जि. बीड), कदम चिंचावन काळे (वय 35, रा. तळेवस्ती) आणि इदगर गारमन चव्हाण (वय 38, रा. शेरी खुर्द) अशी पकडलेल्या चौघांची नावे आहेत. प्रवीण हबाजी भोसले, प्रफुल्ल हबाजी भोसले (दोघे रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) आणि संतोष उर्फ सिंधुशा सुर्यभान काळे (रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी पळून गेलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, आरोपी छगन चिंतामण काळे याच्याविरूध्द यापूर्वी अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दरोडा, घरफोडी व इतर गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.





