नाशिक | प्रतिनिधी
पंचवटीतील हिरावाडी परिसरातील न्यू समृद्धी ज्वेलर्स येथे टाकलेला दरोडा दुकानातील महिलेने दाखवलेल्या धैर्यामुळे अर्धवट राहिल्याची बाब पोलीस तपासातून समोर आली आहे. तब्बल पाच तास परिसराची रेकी करत आंतरराज्य टोळीने ज्वेलर्सवर धाड टाकली; मात्र दुकानातील महिलांप्रती दाखवलेला आदर व अनपेक्षित नरमाईमुळे दरोडेखोरांना फायरिंग करून पूर्ण डाव साधता आला नाही. या प्रकरणाचा छडा लावत गुन्हे शाखेच्या युनिट एक व दोनच्या संयुक्त पथकाने हरियाणा पंजाब सीमेवरील मोहाली येथे धाड टाकून दोन सराईतांना ताब्यात घेतले आहे.
१५ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास आंततराज्य टोळीतील सहा सराईतांनी हिरावाडीतील न्यू समृद्धी ज्वेलर्स हे दुकान लक्ष्य केले होते. दुकानात दरोडा टाकून सोन्या-चांदीचे दागिने लुटण्याचा या टोळीचा प्रयत्न होता. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत आणि गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल व युनिट दोनचे प्रभारी हेमंत तोडकर यांना तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

असा लागला संशयितांचा तपास
तपासादरम्यान उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांना एक महत्त्वाचा तांत्रिक सुगावा मिळाला. घटनेनंतर माग काढण्यासाठी पोलिस पथकाने घटनास्थळापासून ते ओझरपर्यंतच्या मार्गावरील सुमारे ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तसेच परिसरातील दीडशेहून अधिक लॉजची झडती घेतली. या तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे दरोडेखोरांची ही टोळी परराज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेचे विशेष पथक तातडीने पंजाबच्या दिशेने रवाना झाले. पंजाबमधील मोहाली येथे पोहोचल्यावर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तीन दिवस तळ ठोकला. सलग तीन दिवस अथक परिश्रम आणि पाळत ठेवून, संशयित त्यांच्या घरी पोहोचण्याच्या आधीच पथकातील अधिकारी व अंमलदार प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, नाझीमखान पठाण, मुक्तार शेख, कैलास चव्हाण, आप्पा पानावळ, राम बर्डे, गोरक्ष साबळे, विलास चारोस्कर, नितीन जगताप, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, उत्तम पवार, महेश साळुंके आणि राहुल पालखेडे यांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांत हनिपकुमार महेंद्रसिंग (वय ४७, रा. कॉलेज कॉलनी, डेराबस्सी, मोहाली, पंजाब) आणि रणजितसिंग दर्शनसिंग (वय ५२, रा. बहादरपूर फकीर, जि. पटियाला, पंजाब) यांचा समावेश आहे. त्यांनी इतर चार साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
अंबाला कारागृहात मैत्री; मोबाईल ल होते होते बंद
पोलिस तपासात या आंतरराज्य टोळीची धक्कादायक पार्श्वभूमी समोर आली आहे. हे सर्व संशयित २०१० मध्ये हरियाणातील अंबाला कारागृहात एकत्र बंदिस्त होते. तिथूनच त्यांची ओळख व मैत्री झाली. कारागृहातून सुटल्यानंतर त्यांनी एकत्र येत गुजरात, हरियाणा, राजस्थान व पंजाबमध्ये दरोडा व चोरीचे अनेक गंभीर गुन्हे केले. ६ मे रोजी त्यांनी पंजाबमधून थेट मुंबई गाठली होती. पोलिसांना कुठलाही पुरावा मिळू नये आणि ओळख लपवता यावी, म्हणून ६ मे पासूनच त्यांनी स्वतःचे मोबाईल फोन पूर्णपणे स्विच ऑफ (बंद) केले होते.




