Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमNashik Jeweler Robbery Case: एनएसजी कमांडोचं दरोडेखोरात रुपांतर, नशेमुळे लष्करातून निलंबित; समृद्धी...

Nashik Jeweler Robbery Case: एनएसजी कमांडोचं दरोडेखोरात रुपांतर, नशेमुळे लष्करातून निलंबित; समृद्धी ज्वेलर्स दरोड्यातील धक्कादायक अँगल

नाशिक | भारत पगारे
देशाच्या सुरक्षेचे सर्वोच्च कवच मानल्या जाणाऱ्या एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) कमांडोने गुन्हेगारीचा रस्ता धरला तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणाही हादरल्या.हिरावाडीतील समृद्धी ज्वेलर्सवरील दरोड्याच्या तपासात आता धक्कादायक आणि तितकाच खळबळजनक एनएसजी कमांडो अँगल समोर आला आहे.

एनएसजी कमांडोचे दरोडेखोरात धक्कादायक रुपांतर
‘एमडी’ (मेफेड्रॉन) आणि अफिमच्या भयंकर नशेच्या आहारी गेलेल्या एका देशरक्षकाचे दरोडेखोरात झालेले हे रूपांतर धक्कादायकच नसून, झटपट श्रीमंतीच्या विळख्यात अडकलेल्या एका विकृत मानसिकतेचे चित्र मांडणारे आहे. रणजितसिंग दर्शनसिंग (५२, रा. पटियाला, पंजाब) भारतीय लष्करासह ‘एनएसजी’ सारख्या अत्यंत संवेदनशील दलात तब्बल १५ ते १६ वर्षे सेवा बजावलेला हा कमांडो (हवालदार) अवघ्या तीन महिन्यांवर सेवानिवृत्ती आली असताना आणि देशसेवेचे पदक मानाने घरी नेण्याचे वय असताना रणजितसिंग अफिमसह एमडी ड्रग्जच्या जाळ्यात ओढला गेला.

- Advertisement -

Nashik TCS Case: साठ दिवसांची डेडलाईन संपणार; पहिले चार्जशीट दाखल होण्याच्या तयारीत

नशेच्या आहारी गेल्याने लष्करातून निलंबित
नशेच्या याच गर्तेने त्याला गुन्हेगारीच्या दुनियेत ढकलले. त्याची मुलगी सध्या नीट परीक्षेची तयारी करत असून पंजाबमध्ये एका दरोड्याच्या गुन्ह्यात पंजाब पोलिसांनी रणजितला काही दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या आणि लष्कराने कठोर पाऊल उचलत त्याची थेट सेवाच समाप्त करून निलंबित केले आहे. लष्करी शिस्त विसरून हाच कमांडो नाशिकमधील दरोड्याचा एक मुख्य दुवा बनला होता. टोळीतील तिघांवर विविध कर्ज असल्याने त्यांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी दरोड्यांचा सपाटा लावला. या टोळीचा मुख्य मास्टरमाईंड राहुल वेद (सध्या पसार) याने सर्वांना एकत्र आणून हा कट रचला होता. अंबाला जेलमध्ये झालेल्या ओळखीनंतर रणजितसिंग हा राहुल आणि हनिषकुमारच्या संपर्कात आला. या सहा जणांच्या टोळीने यापूर्वी राजस्थान, हरियाणा, गुजरात, पंजाब येथे दरोड्यांचे आणि चोऱ्यांचे धाडसी प्रयत्न केले. त्यात दोन ठिकाणी ते यशस्वीही झाले, तर तब्बल पाच प्रयत्न फेल ठरले होते. आता त्याची पेन्शनही बंद झाल्याचे समजते.

चोरीची कार अन् दुचाकी
या टोळीने नववा मैल येथून एक कार चोरली आणि त्यावर विविध राज्यांच्या बनावट नंबर प्लेट बसवून मुंबई-नाशिक ते थेट मोहाली (पंजाब) असा हजारो किलोमीटरचा प्रवास केला. पोलिसांना चकवा देण्यासाठी ही हायटेक पद्धत वापरण्यात आली होती. न्यू समृद्धी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीने मुंबईतही मोठी रेकी केली होती. मात्र, मुंबईतील गर्दी आणि तत्काळ पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी आपला मोर्चा नाशिककडे वळवल्याचे समोर आले आहे.

गावठी कट्टे होते, पण हुकले धाडस
हिरावाडीत दरोडा टाकत असताना संशयितांनी गावठी कट्ट्यांचा वापर केला होता. त्यांनी शोरूमच्या संचालिका नैना पगारिया यांच्यावर कट्टा रोखला खरा, मात्र ऐनवेळी गोळी झाडण्याचे धाडस आणि हिंमत त्यांना झाली नाही, ही बाब चौकशीत निष्पन्न झाली आहे. एनएसजी कमांडोसारखा प्रशिक्षित व्यक्ती पाठीशी असतानाही नाशिकमध्ये त्यांचा हा दरोड्याचा डाव फसला आणि संपूर्ण टोळी खाकीच्या जाळ्यात अडकली. एका कमांडोचे हे गुन्हेगारी कनेक्शन सध्या नाशिकमध्ये वर्चेचा विषय ठरला आहे.

ताज्या बातम्या

शाळा

Maharashtra Schools: राज्यातील शाळा १५ की २२ जूनला सुरु होणार? शिक्षण...

0
मुंबई | Mumbaiतब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असताना शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय...