मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या गुप्त भेटीगाठींमुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच, आज मुंबईत शरद पवार गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला पक्षाचे तरुण आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. रोहित पवार नाराज असल्याच्या चर्चांना यामुळे अचानक उधाण आलं होतं; पण आता खुद्द रोहित पवारांनीच यावर मौन सोडत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नाराज असल्याच्या आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या भेटीमुळे शरद पवार गटातील काही नेत्यांमध्ये अंतर्गत कुरबूर सुरू झाल्याचे बोलले जात होते. त्यातच रोहित पवार आज मुंबईतील बैठकीला न जाता पुण्यात थांबल्यामुळे, ते या भेटीवर नाराज असल्याच्या वावड्या उठू लागल्या.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक सविस्तर पोस्ट शेअर करत रोहित पवारांनी आपल्या नाराजीच्या बातम्या साफ फेटाळून लावल्या आहेत. “मी नाराज असल्याच्या काही चॅनेलवर सुरु असलेल्या बातम्या या निराधार आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काल काम करणारे आम्ही कार्यकर्ते होतो आणि आजही आहोत.” असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
मुंबईतील बैठकीला उपस्थित न राहण्याचं कारण सांगताना ते म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील कुकडी आणि बारामतीतील शेतकऱ्यांसाठी जनाई-शिरसाईच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने तो सोडवण्यासाठी अचानक सिंचन भवनमध्ये यावं लागलं… कदाचित प्रशासनावर दबाव नसता आणि पाणी सोडण्याचा शब्द त्यांनी पाळला असता तर आज मला पुण्यात सिंचन भवनात येण्याऐवजी मुंबईतील पूर्वनियोजित बैठकीला हजर राहता आलं असतं.” रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “आज राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस मोठ्या अडचणीत आहे. त्यांच्यासाठी निःसंदिग्धपणे ठोस भूमिका घेण्याची आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज आहे. पक्ष आणि वरिष्ठ नेते याबाबत योग्य निर्णय घेतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
रोहित पवारांच्या या आक्रमक आणि स्पष्ट भूमिकेनंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चांवर आता तात्पुरता पडदा पडला असला, तरी आगामी काळात राष्ट्रवादीत नक्की काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




