
नागपूर | Nagpur
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विजयादशमी साजरी करण्यासाठी आरएसएसचे सर्व प्रमुख आणि सदस्य हे नागपूरमधील रेशीमबागमध्ये एकत्र आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित आहेत. मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी सर्वांना संबोधित करत असताना मोहन भागवत यांनी देशासह देशभरातील सर्व घडामोडींवर भाष्य करत सर्वांना एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित करतना सध्याच्या विकास पद्धतीमुळे निर्माण झालेल्या दोषांवर बोट ठेवले. ते म्हणाले की, या अमर्याद विकासामुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी सातत्याने वाढत आहे. आर्थिक सामर्थ्य काही निवडक लोकांच्या हातात एकवटत आहे, ज्यामुळे सामाजिक शोषण आणि पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. एवढेच नव्हे, तर नफ्यावर आधारित या दृष्टिकोनातून समाजात अमानवीयतेचे दोष निर्माण होत आहेत.
तसेच, ‘भारत आर्थिक विकास करत आहे. पण गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे. भौतिक विकासासोबत नैतिक विकास देखील महत्त्वाचा आहे. परिस्थिती अशी आहे की, सुखसुविधा वाढल्या, ज्ञान प्रगती झाली, पण परिवर्तन आणि विज्ञानाच्या गतीमुळे मनुष्यजीवनात ताळमेळ बसत नाही. नागरी जीवनात अत्याचार वाढले आहेत. याचे निराकरण होताना अपयश आले आहे. सध्या घातक विचारधारेचा प्रसार झाला आहे. भारत काही उपाययोजना करेल अशी अनेकांना अपेक्षा आहे. भारताकडून जगाचं विश्वास प्रमाण सतत वाढत आहे.’, असे मोहन भागवत यांनी सांगितले.
हिमालय भागात मोठ्या घटना घडत आहे
पर्यावरणाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करताना त्यांनी हिमालयीन क्षेत्राचा विशेष उल्लेख केला. “गेल्या काही वर्षांत पर्यावरण बदलामुळे हिमालय भागात मोठ्या घटना घडत आहेत. जर विकासाच्या सध्याच्या पद्धतीमुळे हिमालयासारख्या संवेदनशील परिसराला धोका निर्माण होणार असेल, तर सरकारने या विकासाचा पुनर्विचार करायला हवा,” असे मत भागवत यांनी मांडले.
काही देशांच्या भूमिकांवरून आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हे देखील स्पष्ट झाले
सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले की, ‘भारतात पहलगाममध्ये हल्ला झाला आणि धर्म विचारून मारण्यात आले. आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्य आणि सरकारने सडेतोड उत्तर दिले. मागचे वर्ष आमच्या समोर नवीन आणि विविध आव्हाने घेऊन आले. मागच्या वर्षी पहलगाम हल्ला झाला आणि आपल्या सैन्याने त्याचे उत्तर दिले. ही घटना शिकवणारी ठरली. सर्वप्रति मित्रभाव ठेवल्यास आपल्या सुरक्षेसाठी जागृक आणि ताकदवान बनले पाहिजे. काही देशांच्या भूमिकांवरून आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हे देखील स्पष्ट झाले.’
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




