Sunday, April 12, 2026
HomeनगरAhilyanagar : अफवेमुळे दुसर्‍या दिवशीही पेट्रोल पंपांवर झुंबड

Ahilyanagar : अफवेमुळे दुसर्‍या दिवशीही पेट्रोल पंपांवर झुंबड

साठेबाजीने स्टॉक संपला, शहरातील काही पंप बंद || पुरवठा विस्कळीत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सोशल मीडियावर पसरलेल्या अफवेमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करून गरजेपेक्षा जास्त पेट्रोल-डिझेल खरेदी करत साठेबाजी केली. परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील स्टॉक संपला असून, आगाऊ पैसे भरूनही कंपन्यांकडून टँकर उपलब्ध होत नसल्याने काही पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अहिल्यानगर शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर बुधवारी दिसलेली गर्दी गुरूवारीही कायम होती. सकाळपासूनच नागरिकांनी पंपांवर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. काही पंप बंद असल्याने सुरू असलेल्या पंपांवर मोठी झुंबड उडाली.

- Advertisement -

वाहनांमध्ये मिळेल तेवढे पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. शहरासह जिल्ह्यात पेट्रोल मिळत नसल्याच्या अफवा पसरल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आहे. लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांनी घाईघाईने इंधन साठवण्यास सुरूवात केली. त्यामुळे बुधवारी अहिल्यानगर शहर व उपनगरांमध्ये मोठी गर्दी झाली होती, तीच परिस्थिती गुरूवारीही पाहायला मिळाली. यामुळे पूर्वीचा साठा वेगाने संपला. मात्र नवीन टँकर वेळेवर न आल्याने अनेक पंपांवर इंधन उपलब्ध झाले नाही. शहरातील काही पंप पूर्णपणे बंद ठेवावे लागले, तर ज्या पंपांवर इंधन उपलब्ध होते, तेथे प्रचंड गर्दी झाली होती.

सामान्यतः 20 हजार लिटर क्षमतेचा टँकर एका पेट्रोल पंपासाठी तीन दिवस पुरत होता. मात्र, अचानक वाढलेल्या गर्दीमुळे तोच साठा एका दिवसात संपत आहे. त्यानंतर पुढील टँकर मिळण्यासाठी पुन्हा तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने अनेक पंप अडचणीत आले आहेत.

पुरेसा पुरवठा होईना
सरकारकडून पेट्रोल-डिझेलची टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात पंपांना पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार पंप चालकांकडून केली जात आहे. मागणी अचानक वाढल्याने पुरवठा कमी पडला आहे. यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. पुरवठा होत नसल्याने पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. जे पंप सुरू आहेत, तेथे गर्दी होत असल्याचे चित्र अहिल्यानगर शहरात दोन दिवसांपासून पाहयला मिळत आहे.

पेट्रोल चोरी करणार्‍या टोळ्या सक्रिय
दरम्यान, या परिस्थितीचा गैरफायदा घेत पेट्रोल चोरी करणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. शहरात एकीकडे पंपांवर गर्दी असताना, दुसरीकडे रात्रीच्या वेळी उभ्या वाहनांमधून पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक नागरिकांनी आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून ठेवल्याने चोरट्यांचे लक्ष त्याकडे वळले आहे. रस्त्याच्या कडेला किंवा घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांमधून बाटल्यांच्या सहाय्याने पेट्रोल काढण्याचे प्रकार वाढले आहेत. सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता परिसरातील नरहरी नगर येथे घडलेली पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. या फुटेजमध्ये चोरटे वाहनांच्या टाक्यांमधून पेट्रोल काढताना स्पष्ट दिसत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : श्रीरामपूरच्या व्यक्तीकडून नगरच्या ठेकेदाराला सव्वा तीन कोटींचा चूना

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर येथील एका तरूण कंत्राटदाराची तब्बल 3 कोटी 50 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक...