Thursday, July 30, 2026
HomeराजकीयSunetra Pawar : रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?

Sunetra Pawar : रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?

मुंबई । Mumbai

गेल्या काही दिवसांपासून भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि आपले राजीनामा पत्र सुपूर्द केले. या राजीनाम्यामुळे राज्य राजकारणात मोठी खळबळ माजली असून, खरात प्रकरण आता अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

विकृत मानसिकतेच्या अशोक खरातसोबत असलेल्या कथित संबंधांवरून चाकणकर यांच्यावर विरोधक आणि विविध महिला संघटनांनी टीकेची झोड उठवली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती, मात्र वाढता दबाव लक्षात घेता त्यांनी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे.”

राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी स्वतःची बाजू मांडली. त्यांनी त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले असून आपण कोणत्याही चुकीच्या कामात सहभागी नसल्याचे सांगितले. चाकणकर म्हणाल्या की, “मी एक महिला असल्यामुळे मला सहजपणे ‘सॉफ्ट टार्गेट’ करण्यात आले आहे. अशोक खरातचे अनेक बड्या व्यक्तींसोबत फोटो आहेत, मग केवळ मलाच लक्ष्य का केले जात आहे? गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी, माझे पती आणि संपूर्ण कुटुंब कार्यक्रमाला उपस्थित होतो, यात काहीही गैर नाही.”

माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या व्हिडिओंवर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की, “जे व्हिडिओ दाखवले जात आहेत ते पाच-सहा वर्षांपूर्वीचे आहेत. त्यावेळी गुरुपौर्णिमेला अनेक भाविकांनी पाद्यपूजा केली होती, त्यात आमचाही समावेश होता. पाच वर्षांपूर्वी आपण ज्यांच्या संपर्कात असतो, त्यांच्या वर्तणुकीत भविष्यात काय बदल होतील किंवा ते कोणत्या गुन्ह्यात अडकतील, याची कल्पना कोणालाही नसते. केवळ जुन्या संबंधांवरून कोणाचे चारित्र्यहनन करणे चुकीचे आहे.”

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे....