नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाने आधीच धुमसत असलेल्या क्रिमिया परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण बातमी समोर आली आहे. क्रिमियामध्ये रशियन लष्करी वाहतूक विमान, एएन-26, कोसळले. विमानात तेवीस प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. या अपघातात सर्वांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी हे मालवाहू विमान एका उंच पहाडाला धडकले. यामध्ये रशियन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रशियन हवाई दलाचे An-26 हे विमान बुधवारी सकाळी आपले नियमित उड्डाण करत होते. मात्र, काळ्या समुद्राच्या किनारपट्टीवर असलेल्या क्रिमिया द्वीपकल्पावर पोहोचल्यानंतर विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क अचानक तुटला. काही वेळातच हे विमान दुर्गम डोंगराळ भागातील पहाडावर जाऊन आदळले. हा अपघात इतका भीषण होता की, विमान पडाडाला धडकताच त्याचे तुकडे झाले आणि विमानाने पेट घेतला. रशियन वृत्तसंस्था ‘तास’ने दिलेल्या माहितीनुसार, शोध पथकाला विमानाचा ढिगारा सापडला असून, हा अपघात इतका भीषण होता की दुर्घटनेत कुणीही जिवंत राहण्याची शक्यता उरलेली नाही.
संपादकीय : १ एप्रिल २०२६ – संघर्षाकडून शांततेकडे…
खराब हवामानामुळे अपघात झाल्याची शक्यता
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या दुर्घटनेचा दुजोरा दिला आहे. विमानात एकूण २९ जण स्वार होते, ज्यामध्ये २३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्सचा समावेश होता. या सर्वांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, खराब हवामान किंवा विमानातील तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले असावे आणि विमान थेट पहाडावर आदळले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विमानाची वैशिष्ट्ये
एएन-26 हे सोव्हिएतकालीन लष्करी वाहतूक विमान असून ते अँटोनोव्ह कंपनीने तयार केले आहे. त्याचे पहिले उड्डाण 1969 मध्ये झाले होते. याचा उपयोग सैन्य, शस्त्रे आणि लष्करी उपकरणे वाहून नेण्यासाठी केला जातो. ते एका वेळी डझनभर सैनिक किंवा अवजड माल वाहून नेऊ शकते.
जुन्या रचनेमुळे सुरक्षिततेबद्दल शंका
लहान आणि खराब धावपट्टीवरून उड्डाण करण्याच्या या विमानाच्या अद्वितीय क्षमतेमुळे ते दुर्गम आणि युद्धक्षेत्रात वापरण्यासाठी योग्य ठरते. त्याच्या मोठ्या मागील मालवाहू दरवाज्यामुळे हवाई मार्गाने माल टाकणे शक्य होते. 50 वर्षांहून अधिक जुन्या रचनेमुळे त्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वेळोवेळी या विमानाचे अपघात झाले आहेत. हे विमान अजूनही अनेक देशांमध्ये वापरात आहे, परंतु हळूहळू त्याची जागा आधुनिक वाहतूक विमानांनी घेतली जात आहे.




