शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्या लाखो भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी आता शिर्डीचे प्रशासन एकवटले आहे. शहरातील काही दुकानदारांकडून प्रसाद, मूर्ती आणि इतर वस्तू अव्वाच्या सव्वा दराने विकल्या जात असल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिर्डी नगरपरिषद, साईसंस्थान आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे कठोर पाऊले उचलली आहेत. याअंतर्गत शहरातील सर्व वस्तूंसाठी संदर्भ दर निश्चित करण्यात आले असून त्याचे पालन सर्व व्यावसायिकांसाठी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिली.
या निर्णयामुळे एका बाजूला भक्तांची फसवणूक थांबेल, तर दुसर्या बाजूला प्रामाणिक व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. नगरपरिषदेने ठराव करून व या व्यवसायातील तज्ञाचे मार्गदर्शन घेऊन या दरपत्रकास कायदेशीर मान्यता दिली आहे. या नव्या नियमांनुसार, प्रत्येक दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांना प्रशासनाने ठरवून दिलेले दरपत्रक दर्शनी भागात लावणे सक्तीचे आहे. या दरांच्या आतच उच्च गुणवत्तेच्या आणि योग्य वजनाच्या वस्तूंची विक्री करणे बंधनकारक असेल. तसेच, प्रत्येक वस्तूवर दुकानाचे नाव, किंमत, एक्सपायरी तारीख आणि संपर्क क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले, या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर नगरपरिषद आणि पोलीस विभागामार्फत संयुक्तपणे कायदेशीर कारवाई केली जाईल. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 15 जुलै 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर, विशेष भरारी पथके शहरात नियमित पाहणी करून नियमांचे पालन होते की नाही, याची कडक तपासणी केली जाईल. माहितीच्या प्रसारासाठी प्रशासनाकडून क्युआर कोड आणि सार्वजनिक ठिकाणी फलकही लावले जाणार आहेत. प्रशासनाच्या या नव्या नियमावलीमुळे अव्वाच्या सव्वा दराने वस्तू विकणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
हा विषय एकाच वेळी हजारो व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा आणि लाखो भक्तांच्या भावनांचा आहे. त्यामुळे भक्तांची लूट थांबवताना प्रामाणिक व्यवसायाला धक्का बसू नये, याचा विचार करून प्रशासनाने ही संतुलित पण कणखर भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे शिर्डीतील बाजारपेठेत पारदर्शकता येऊन तीर्थक्षेत्राची प्रतिमा अधिक उजळ होईल आणि अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीचे खर्या अर्थाने पालन होईल.
– नितीन कोते





