राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सदगुरु गंगागिरी महाराजांनी सप्ताहाच्या माध्यमातून त्याकाळात व्यसनमुक्तीचे काम केले. व्यसनाने अनेकांचे जीवन बरबाद केले. बिडी, सिगारेट, तंबाखु, मिसरी सोडून द्या, व्यसनाने कॅन्सर होतो. आता केंद्र व राज्य सरकार हे काम करत आहे, सरकारच्या व्यसनमुक्ती अभियानात सहभाग घ्या, सरकारचे काम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.
राहाता तालुक्यातील श्रीश्रेत्र धनगरवाडी येथे सदगुरु योगिराज गंगागिरी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताहाच्या कालच्या सहाव्या दिवशीच्या पाचव्या प्रवचन पुष्पात महंत रामगिरी महाराज भाविकांना उपदेश करत होते. काल सप्ताहाचे मैदान तुडूंब भरले होते. सर्व रस्त्यांवर भाविकांना ट्रॅफिक जॅमचा त्रास सहन करावा लागला. काल 7 ते 8 लाखांच्या पुढे भाविकांनी सप्ताहाला हजेरी लावली. सप्ताहाकडे येणारे सर्व रस्ते भाविकांनी तुडूंब भरुन वाहत होते. हिरव्या गर्द शेतात वाहन पार्किंगची सोय सप्ताह कमिटीने केली होती.
यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, भाऊसाहेब ठोंबरे, पंकज ठोंबरे, छत्रपती संभाजीनगरचे माजी सभापती संतोष जाधव, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, कुदळे अॅग्रोचे भगिरथ कुदळे, सुरेश थोरात, आण्णासाहेब कोते, संपतराव लहारे, डॉ. वसंतराव लबडे, डॉ. संपतराव शेळके, दिनकर भोरकडे, धनंजय जाधव, दादासाहेब सांबारे, संजय शेळके, राजेंद्र लहारे, नितीन एलम, अनिल शेळके सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, विक्रम महाराज, बाळासाहेब रंजाळे महाराज, चंद्रकांत सावंत महाराज, नवनाथ महाराज म्हस्के, दत्तात्रय बहिरट महाराज, विठ्ठलदास असावा, जानकीनाथ महाराज आदमाने, लक्ष्मण रक्टे, दिलीप तांबे, सचिन बडे, अजय फोपसे, बाबासाहेब चिडे, विखे कारखान्याचे व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, कार्यकारी संचालक महेश कोनापूरे, संचालक लाटे, ताटे, यादव अदिंसह भाविक मोठ्या सख्येने उपस्थित होते.
प्रवचनात महाराजांनी भक्ती, प्रेम यावर विविध प्रसंग, दाखले देत भगवंताची भक्ती कशी असावी, याबाबत सविस्तर विवेचन आपल्या श्रवणीय वाणीतुन केले. ऊन आणि पावसाचा खेळ प्रवचनादरम्यान सुरु होता. भाविक पावसात आणि भक्तीरसात डूंबून गेले. हा भक्तीचा सोहळा पाहुन वरुण राजालाही हेवा वाटला. अधुन मधून हजेरी लावत भाविकांची परीक्षा पाहिली. भाविक मात्र भक्तीरसात डूंबल्याने आपल्या जागेवर शेवटपर्यंत खिळून होते. अनन्यभाव जेथे आहे, तेथे विशुध्द प्रेम असते. भगवंतावर अंतरकरणातून प्रेम करावे, तेथे हृदय शुध्द होते आणि प्रेम धारण करण्याची क्षमता निर्माण होते. प्रेमाची सहा लक्षणं नारद भक्ती सुत्रात सांगितले आहेत. यात गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षवर्धमानम, सुक्ष्मतरम, अनुभवरुपम, अविच्छिनम. प्रेमात अडथळे निर्माण झाले तरी अबाधित राहाते, ते खरे प्रेम. अनेक विक्षेप निर्माण होतात. तरीही प्रेम टिकून राहते. आता काही दिवसही प्रेम टिकत नाही.
भगवान कृष्णाने गोकुळाचा त्याग केला. मथुरेला निघून गेले. त्यावेळी गोपिकांच्या वियोगाचे वर्णन महाराजांनी खास शैलीत केले. कृष्णाने गोकुळाचा त्याग केल्यानंतर ते कधीही गोकुळात गेले नाही. गोपिकाही मथुरेत गेल्या नाही. भगवंत श्रीकृष्ण गोकुळात का गेले नाहीत. मथुरेत गेल्यानंतर कंसाला ठार मारलं, कंसाच्या दोन पत्नी होत्या. अस्ती आणि प्राप्ती. जरासंधाला जावयाला मारल्याने राग आला. म्हणून जरासंधाने मथुरेवर 17 वेळा स्वार्या केल्या. शत्रूचा एक उद्देश असतो, समोरच्याच्या प्रिय व्यक्तीवर आघात करणे. कधीही गोकुळात गेले नाही, इतके प्रेम आहे. प्रेमात दुसर्याचा विचार आहे. ज्यावेळी भगवंत गोकुळातून निघून गेले, त्याचे वर्णन नामदेव महाराजांनी केले. महाराजांनी भगवंता प्रती असलेले गोकुळावाशियांच्या विरहाचे वर्णन केले. कृष्णाला गोकुळातून नेण्यासाठी आलेला अक्रुराने गोपिकांचे प्रेम पाहिले. या अक्रुराने सिमंतक मण्यासाठी कृष्णाच्या सासर्याची हत्या केली. लोक भक्ती करतात, स्वार्थ असेल तर ते प्रेम नाही.
देशाच्या सिमेवर तैनात असलेल्या सैनिकांची भारत मातेसाठी मरण्याची तयारी असते. हे त्यांचे भारत मातेवरचे प्रेम आहे. प्रेमाची पाच लक्षणे सांगत महाराज म्हणाले, प्रेम हे सुक्ष्म असते. सासुकरिता सुन रडते हे खरे प्रेम असते का हो! दिपक जळतो तो इतरांना प्रकाश देतो. व्यसनाने जीवन बरबाद होते. सदगुरु योगिराज गंगागिरी महाराज यांनी सप्ताहाच्या माध्यमातून पहिल्यांदा समाज व्यसनमुक्त व्हावा म्हणून प्रयत्न केले. त्या काळात गोदा काठावरील गावातील समाज तमाशाकडे आकर्षित झाला होता. महाराजांनी त्यांना भजनाकडे आकर्षित केले. व्यसनमुक्तीच्या निर्णयावर बोलतांना महंत रामगिरी महाराज म्हणाले, सरकारने घेतलेला व्यसनमुक्तीचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. परंतु केवळ सरकारी नियमांनी किंवा कायद्याने व्यसनमुक्ती पुर्णपणे यशस्वी होणार नाही. हा निर्णय यर्थार्थ करण्यासाठी स्वतःहुन पुढाकार घेवून व्यसनमुक्तीचा अंतकरणातुन संकल्प करण्याची गरज आहे.
बीडी, सिगारेट, तंबाखु तसेच महिलांनी मिसरी पासून दूर व्हावे. ही व्यसने आहेत. व्यसनाने कॅन्सर सारखे आजार होतात. माणसाची बरबादी होते. आहाराबाबत पुन्हा भाष्य करतांना महाराज म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने मांसाहर न करता शाकाहरी असावे. मनुष्य जन्म हा मांसाहारासाठी झालेला नाही. निसर्गाने मानवी दातांची आणि आतड्याची रचना हिंस्त्र प्राण्यासारखी बनवलेली नाही. जिभेने पाणी पितात त्यांचे ते खाणे आहे. आपण शुध्द शाकाहार घ्यावा असे ते म्हणाले. याप्रसंगी राजस्थान येथील माऊंटआबु येथील प्रजापती ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयातील टिम आली होती. त्यांची 1 कोटी समाजाला व्यसनमुक्तीचा संकल्प केला आहे. महाराजांनी यावेळी प्रवचन मैदानातील उपस्थिीत लाखो भाविकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.
चांदीची गदा भेट
पहिलवान रविंद्र वाघ यांनी महंत रामगिरीजी महाराज यांना सप्ताहात चांदीची गदा भेट दिली.
उद्या मंगळवार दि. 25 ऑगस्ट रोजी या सप्ताहाची महंत रामगिरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार उपस्थित राहणार आहेत. सरकारी यंत्रणेने हॅलिपॅडसाठी जागेची पाहणी केली.
सोमवारी एकादशी असल्याने दुपारी 1 वाजता प्रवचन आणि लगेच 2 वाजता एकादशी किर्तन सुरु होणार आहे. भाविकांना 500 क्विंटल साबुदाना खिचडी वाटप करण्यात येणार आहे. यासाठी 300 क्विंटल साबुदाना, 100 क्विंटल शेंगदाने, बटाटे व अन्य पदार्थ असा 500 क्विंटल खिचडीचे वाटप भाविकांना करण्यात येणार आहे. 150 क्विंटल भगर वाटप करण्यात येणार आहे. आज विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे सप्ताहास दुपारी 1 वाजता भेट देणार आहेत. पुढील वर्षीच्या 180 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची मागणी होत आहे. काल पुणतांबा, वाकडी, मातुलठाण, मालुंजे (गंगापूर), तळेगाव मळे (कोपरगाव), पुरणगाव (वैजापूर) आदी 13 गावांनी सप्ताहाची मागणी केली.




