Thursday, May 2, 2024
Homeभविष्यवेधभिक्षुक होणे भौतिकतेच्या पल्याड जाण्याचा मार्ग

भिक्षुक होणे भौतिकतेच्या पल्याड जाण्याचा मार्ग

आध्यात्मिक असणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मंदिरात जाऊन प्रार्थना करावी. जर देव पृथ्वीवर खाली आला आणि तुम्हाला उघडपणे म्हटले की ते तुमच्या कोणत्याही संसारिक गरजा पूर्ण करण्यास तयार नाहीत, तर बहुतेक लोक त्यांच्याशी कोणताच संबंध ठेवणार नाहीत. तुमचे देव तुमच्यासाठी उत्तम भाग्य, भरपूर संपत्ती, उत्तम आरोग्य आणि भरगोस यश मिळवून देतील असा तुमचा विश्वास असतो आणि म्हणूनच बहुतेक लोक मंदिरात जातात.

अध्यात्म म्हणजे भौतिकतेच्या पलीकडे असणार्‍या गोष्टींचा ध्यास घेणे, मग ते काहीही असो. आत्ता ह्या क्षणी तुम्ही तुमच्या पंचेंद्रियांच्या सीमित मर्यादांमधून क्षणोक्षणी सृष्टी अनुभवता, म्हणून तुमचा संपूर्ण जीवनानुभव भौतिकतेपर्यंतच सीमित आहे. जे भौतिकतेच्या पल्याड आहे त्याचा ध्यास जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर भौतिकता नाकारण्याची काहीही गरज नाही, पण भौतिकतेच्या पलीकडे जाण्यासाठी राजी असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

योगामध्ये, आम्ही एखाद्या व्यक्तीला तिच्या सध्या असणार्‍या भौतिक मर्यादांच्या पलीकडे पहाण्यासाठी मदत व्हावी म्हणून अनेक क्रिया, प्रक्रिया, पद्धती वापरतो. यापैकी एक म्हणजे परीव्रजक अर्थात भटका भिक्षुक बनणे. या देशात, भिक्षा मागणे अपमानास्पद समजले जात नाही. भिक्षा मागणे हे आपण आपला स्वतःचा गुण वाढविण्याचे आणि आपल्या संकुचित मर्यादा मोडून टाकण्याचे एक साधन म्हणून पाहतो.

तुमचे पुढचे जेवण तुम्हाला 8 वाजता मिळणार आहे याची जेव्हा तुम्हाला खात्री असते, तेव्हा आयुष्य एकप्रकारे चालते. जेव्हा तुमचे पुढचे जेवण कुठे आणि कसे मिळेल याची काहीच खात्री, खबर नसते, तेव्हा आयुष्य अगदी वेगळे असते. जेव्हा ते तुमच्याकडे असते, तेव्हा अन्न ही अतिशय सोपी गोष्ट वाटते; पण जेव्हा ते तुमच्याकडे नसते, तेव्हा ती एक कठीण समस्या बनते. तुम्हाला भुकेने व्याकुळ होणे म्हणजे काय हे माहित नाही, इतके व्याकूळ की कुठल्याही क्षणी तुम्ही कोसळणार, असे असूनही स्वाभिमानाने आणि सजगतेने वाटचाल करत राहणे हे किती मोठे दिव्य आहे याची तुम्हाला कल्पना नाही. एखाद्या व्यक्तीला तसे करण्यासाठी प्रचंड मानसिक शक्तीची गरज असते.

जेव्हा तुमचे पोट भरलेले असते तेव्हा तुमच्या आयुष्यातील अनेक मूलभूत तथ्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते. भूक हीच एक अशी वेळ आहे जेव्हा तुम्हाला शरीराचे वास्तविक अस्तित्व जाणवते. पण जेव्हा तुम्ही भुकेले असूनसुद्धा जागरूकता कायम ठेवून स्वाभिमानाने वाटचाल करत राहता, तेव्हा तुम्ही कोणीतरी वेगळीच व्यक्ती बनता.

भारतातील सर्वात प्रभावशाली पन्नास व्यक्तींमध्ये समावेश असलेले सद्गुरु हे एक योगी, गूढवादी, द्रष्टे आणि लोकप्रिय लेखक आहेत. 2017 साली, सद्गुरूंना भारत सरकारतर्फे अतुलनीय कामगिरीसाठी देण्यात येणार्‍या पद्मविभूषण या सर्वोच्च वार्षिक नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या