शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
विश्वाला श्रद्धा-सबुरीचा संदेश देणार्या श्री साईनाथांच्या समाधीस्थळी गुरुवारी 107 व्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी भक्तीभावाचा महासागर उसळला. देश-विदेशातील लाखो भाविकांनी रात्रंदिवस साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिर व परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला. या उत्सवात मंदिर परिसरात मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व समुद्र मंथनातून प्रकटलेल्या रत्नांवर आधारित साईरत्न हा आकर्षक देखावा तर ओडिशा येथील दानशूर साईभक्त सदाशिव दास यांच्या देणगीने मंदिर व मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावट साईभक्तांसाठी लक्षवेधी ठरली.
उत्सवाच्या मुख्य दिवशी द्वारकामाईत सुरु असलेल्या साईसचरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्तीनंतर साईबाबांच्या प्रतिमेची व साईसचरित्र या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी 7 वाजता संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे-सोनटक्के व त्यांच्या पती प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर लेंडीबाग येथे ध्वज पूजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता शिर्डी शहरातून काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रमाचे आयोजन झाले. सकाळी 10 वाजता शोभना देशपांडे, नाशिक यांचे कीर्तन झाले. तसेच सकाळी 10.30 वाजता संस्थानचे अध्यक्ष अंजू शेंडे व त्यांचे पती प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते समाधी मंदिरात आराधना करण्यात आली.
सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सायंकाळी 6:15 वाजता श्रींची धुपारती झाली. 7:30 वाजता शैलेंद्र भारती, मुंबई यांचा साईभजन संध्या, रात्री 9:15 वाजता गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक झाली. रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत श्रींच्या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम झाला. उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे शेजारती पहाटेची काकड आरती होणार नाही.
शुक्रवारी उत्सवाच्या तृतीय दिवशी पहाटे 6 वाजता श्रींचे मंगलस्नान, 7 वाजता श्रींची पाद्यपूजा होईल. दुपारी 12:30 वाजता श्रींची मध्यान्ह आरती होईल. दुपारी 1 ते 3 पद्मावती पारेकर, पुणे यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी 4 ते 6 वर्षा टाकळीकर, बांद्रा पश्चिम यांचा एकादशी कीर्तन कार्यक्रम व सायंकाळी 6:15 वाजता धुपारती होईल. तसेच सायंकाळी 7 वाजता अश्विनी सरदेशमुख, मुंबई यांचा साई गीतांजली कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर होणार आहे. रात्री 10 वाजता श्रींची शेजारती होईल.





