Monday, October 14, 2024
Homeनगरसाई संस्थानचे 598 कामगार सेवेत कायम

साई संस्थानचे 598 कामगार सेवेत कायम

महायुती सरकारमुळेच ऐतिहासिक निर्णयः ना. विखे पाटील

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

साईबाबा संस्थानमधील कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याच्या निर्णयासाठी माझ्यासह सर्वांनाच संघर्ष करावा लागला. मात्र साईबाबांच्या श्रध्दा आणि सबुरीच्या अनुकरणामुळे हा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारमुळे होऊ शकला. कामगारांना न्याय देणार या दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती या निर्णयामुळे झाली असल्याचे समाधान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. संस्थान मधील 598 कामगारांसह आऊट सोर्सिंग कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला. याची अंमलबजावणी त्रिसदस्यीय समितीने करून कामगारांना नियुक्तीपत्र देण्याचाही निर्णय घेतला.

मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत कामगारांना आज प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी आधिकारी गोरक्षनाथा गाडीलकर, उपकार्यकारी आधिकारी तुकाराम हुलवळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, डॉ.सुजय विखे पाटील, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, अभय शेळके, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश गोंदकर, एम्प्लॉईज संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार, संदीप सोनवणे, नितीन कोते, गोपीनाथ गोंदकर, ताराचंद कोते, विलास कोते, बाबासाहेब कोते, यांच्यासह आधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

कामगारांच्या जीवनातील आजचा दिवस नवे चैतन्य घेवून येणार आहे. हा निर्णय व्हावा म्हणून अनेक वर्षे कामगारांना संघर्ष करावा लागला. निर्णयासाठी मंत्रालय स्तरावर कित्येक बैठकाही झाल्या, पत्रव्यवहार झाले. अनेकांनी हा निर्णय होण्याआधीच फाटे फोडून कामगारांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. परंतू मी तुम्हाला शब्द दिला होता. त्याची पुर्तता आज होत असल्याचा माझ्या जीवनातील मोठा आनंद आज होत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. हा निर्णय होण्यासाठी महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांच्यासह मंत्री मंडळातील सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करुन, ना.विखे पाटील म्हणाले, सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने सुध्दा सकारात्मक भूमिका घेवून सुरु केली, याचेही समाधान आहे.

झालेल्या निर्णयातून सर्वच कामगारांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करुन आता कामगारांची जबाबदारी वाढली आहे. येणार्‍या भाविकांना सुविधा देण्यासाठी तेवढ्याच कर्तबागारीने तुम्हाला कार्यरत रहावे लागणार आहे. संस्थानचे उत्पन्न वाढविण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील याची जाणीव करुन देत मंत्री विखे पाटील म्हणाले, या शहराच्या विकासासाठी प्रत्येक निर्णय हा दुरदृष्टीकोनातून घेतला. विमानतळाला निधी देवू नका म्हणून अनेकांनी विरोध केला. आज विमानतळाचा फायदा शिर्डीकरांनाच होत आहे. भविष्यात होणारे थिमपार्क तसेच दोन हजार क्षमतेचा ऑडीटोरीअम हॉल, औद्योगिक वसाहत या सर्व गोष्टी शिर्डी आणि परिसरातील नागरीकांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले, सर्वांच्या योगदानामुळे आजचा हा महत्वपूर्ण निर्णय होवू शकला. ना.विखे पाटील यांनी या निर्णयाबाबत दिलेला शब्द पुर्ण केला असल्याचे सांगून शेवटच्या कामगाराला न्याय देण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी गोरक्ष गाडीलकर, तुकाराम हुलवळे यांचीही भाषणं झाली. कामगारांच्या वतीने ना.विखे पाटील आणि डॉ.सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री विखे पाटील कामगारांना आवाहन करताना म्हणाले, या एैतिहासिक निर्णयामुळे तुम्हा कामगारांना आता चांगले काम करण्याची संधी आहे. शिर्डी नगरीची प्रतिमा अधिक कशी उंचावेल याची जबाबदारीही तुम्हाला घ्यावी लागेल. कारण येणार्‍या भाविकांचे समाधान करणे हे आता तुमच्या हातात आहे. इतके चांगले काम करा की शिर्डी माझे घर आणि शिर्डी माझे पंढरपुर असेच सर्वांना वाटेल.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत असलेल्या 598 कामगारांना खर्‍या अर्थाने त्यांनी न्याय दिला. त्यांच्यामुळेच कामगारांच्या घरी आज दिवाळी साजरी होणार असून ना. विखे पाटील यांचे सर्व कामगारांच्यावतीने मनस्वी आभार.
– योगेश सोनवणे, कामगार

गेल्या अनेक वर्षांपासून 598 कामगारांचा कायम करण्याचा प्रश्न प्रलंबित होता ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नासाठी पाठपुरावा करून कामगारांना कायम करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे महिला म्हणून माझ्यासह इतर सर्व महिला कामगारांना या निर्णयामुळे आनंद झाला आहे.
– सुनीता चव्हाण, महिला कामगार.

- Advertisment -

ताज्या बातम्या