श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील मेन रोडवरील पोपट भगिरथ महाले या सराफ दुकानात ग्राहकांनी तारण ठेवलेले साडेपाच लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोपट भगिरथ महाले सराफ दुकानातील मॅनेजर श्याम प्रकाश माळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दुकानात 25 कामगार काम करत असून त्यापैकी आरोपी रोहित राजू शिंदे (रा. कुंभारगल्ली, श्रीरामपूर) हा ग्राहकांना चहा-पाणी देण्याचे काम करत होता.
मागील काही महिन्यांपासून तारण ठेवलेल्या वस्तूंमध्ये बरेचसे सोन्या-चांदीचे दागिने सापडत नव्हते, तेव्हा मागील पाच महिन्यांचे रेकॉर्ड तपासले असता तारण ठेवलेले सोने व रेकॉर्ड रूममध्ये उपलब्ध असलेले सोने यामध्ये तफावत आढळून आली. यावेळी दुकानातील सर्व फुटेज तपासले असताना हेल्पर शिंदे याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. त्यामुळे खात्री पटवण्यासाठी एक बनावट सोन्याची पोत रेकॉर्डमध्ये ठेवण्यात आली. 30 जूनला आरोपी हा नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता दुकानात आला, दुपारी बाराच्या सुमारास रेकॉर्डमध्ये गेला व तिथे ठेवलेली बनावट सोन्याची पोत खिशात टाकून तो घाईघाईने दुकानात जाण्यासाठी निघाला असता त्याला आम्ही पकडले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने संधी मिळेल तेव्हा दागिने चोरले असल्याचे सांगितले.
तसेच हे दागिने सारिका सचिन खोमणे, रा. कुंभार गल्ली व तिचा भाऊ (नाव माहीत नाही) यांना विकत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच यापूर्वी महाले यांच्या दुकानात काम करणारा श्रीराम बाबुराव महाजन, रा. नाशिक याने देखील रेकॉर्ड रुममधून तारण ठेवलेले दागिने चोरले होते व त्यानेच मला रेकॉर्ड रुममधून दागिने कसे चोरायचे? हे सांगितले असे रोहित शिंदे म्हणाल्याचे शाम माळवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी रोहित शिंदे याने 4 लाख 65 हजार 520 रुपयांचे दागदागिने चोरले. त्यात सोन्याचे पँडेल, मनचली, सोन्याच्या चैनी, सोन्याच्या चपलाहार, सोन्याचे ओमपान, आयरिंग, टॉप, पळ्या, मणीपोत, मुरणी आदी दागिन्यांचा समावेश आहे. शाम माळवे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी रोहित राजू शिंदे, सारिका सचिन खोमणे व तिचा भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.




