Wednesday, April 15, 2026
HomeराजकीयBihar Politics : बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या रुपात मिळाला भाजपचा पहिला मुख्यमंत्री;...

Bihar Politics : बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या रुपात मिळाला भाजपचा पहिला मुख्यमंत्री; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

पाटणा । Patana

- Advertisement -

बिहारमध्ये ऐतिहासिक सत्तांतर पाहायला मिळाले आहे. दोन दशकांचे नितीश युग संपुष्टात आले असून बिहारच्या राजकारणात बुधवारी एका नवीन पर्वाचा उदय झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे खंबीर नेतृत्व सम्राट चौधरी यांनी बिहारचे 24 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

१६ नोव्हेंबर १९६८ रोजी जन्मलेल्या सम्राट चौधरी यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे बिहारमधील दिग्गज राजकीय व्यक्तिमत्व आणि माजी मंत्री होते. नितीश कुमार यांनी जेव्हा ‘लव-कुश’ (कुर्मी-कोइरी) समीकरणावर समता पक्षाची स्थापना केली, तेव्हा शकुनी चौधरी हे ‘कुश’ समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून समोर आले होते. सम्राट चौधरी यांनी गेल्या ३५ वर्षांच्या राजकीय प्रवासात राष्ट्रीय जनता दलापासून (RJD) सुरुवात केली होती आणि ते राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

सम्राट चौधरी हे मूळचे भाजप किंवा संघाचे स्वयंसेवक नाहीत. सुमारे सात वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, पक्षात आल्यापासून त्यांनी अत्यंत वेगाने प्रगती केली आहे. २०१८ मध्ये पक्षात सामील झाल्यावर २०१९ मध्ये त्यांची उपमुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली. २०२० मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, नितीश कुमार जेव्हा महाआघाडीत होते, तेव्हा सम्राट चौधरी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्यावर अत्यंत टोकदार टीका केली होती. त्यांच्या याच आक्रमक स्वभावामुळे २०२३ मध्ये त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आणि नंतर ते एनडीए सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले.

बिहारच्या राजकारणात ‘लव-कुश’ (कुर्मी-कोइरी) समीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे आहेत, तर सम्राट चौधरी कोइरी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. एकेकाळी नितीश कुमार यांचे कट्टर विरोधक राहिलेले सम्राट चौधरी आज त्यांच्याच पसंतीचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले आहेत. मुंगेर जिल्ह्यातील तारापूर मतदारसंघाचे आमदार असलेले सम्राट चौधरी यांचे या भागात मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या वडिलांची ओळख मुंगेरपासून खगरियापर्यंत पसरलेली असल्याने या भागातील जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळतो.

सम्राट चौधरी यांचा प्रवास वादांशिवाय राहिला नाही. सुरुवातीच्या काळात वयाच्या अटीमुळे त्यांना राजकारणातून काही काळ दूर राहावे लागले होते. तसेच त्यांच्या शैक्षणिक पदव्यांच्या वैधतेवरही राजकीय विरोधकांनी आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, या सर्व आरोपांना मागे सारत सम्राट चौधरी यांनी भाजपमध्ये स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. आता मुख्यमंत्री म्हणून बिहारच्या विकासाचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना

Aaditya Thackeray: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाच्या चर्चा; आदित्य ठाकरेंनी एका...

0
मुंबई | Mumbaiशिवसेनेच्या स्थापना दिनी ठाकरे गटात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. २००३ मध्ये महाबळेश्वर येथील अधिवेशनात ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...