घारी (वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या सुमारे २९ किमी दोन्ही बाजूच्या सर्विस रस्त्याच्या दोन्ही बाजूनी करण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे वृक्षारोपण अक्षरशः वाया गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तब्बल २७ कोटी रुपये खर्च करून पाच लाईनमध्ये लावलेली झाडे आज पूर्णपणे वाळून गेली असून संपूर्ण प्रकल्पच पाण्यात गेल्याचे चित्र दिसत आहे.
झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी बसविण्यात आलेल्या नळ्या अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत पडून आहेत. परिणामी पाणीपुरवठा बंद पडला आहे. हजारो झाडे काही महिन्यांतच कोमेजून नष्ट झाली. पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली केलेल्या या कामाची देखभालच झाली नसल्याने हा प्रकार अधिकच गंभीर ठरत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नाशिक शिबीर कार्यालयाचे अधिकाऱ्यांचे या कामाकडे झालेले दुर्लक्ष स्पष्टपणे समोर येत आहे.
या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे चित्र असून प्रशासनाची निष्क्रियता उघडपणे दिसून येत आहे. दरम्यान, २७ कोटी रुपयांची अक्षरशः उधळपट्टी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याला जबाबदार कोण? एवढी गंभीर बाब का दुर्लक्षित केली? असा संतप्त सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेला प्रकल्प देखभालीअभावी कोलमडणे ही केवळ निष्काळजीपणाची नव्हे तर जबाबदारी झटकण्याची बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
झाडांची काळजी न घेतल्याने शासनाच्या योजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तुटलेल्या पाण्याच्या नळ्या, बंद पडलेला पाणीपुरवठा आणि वाळलेली झाडे हे प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, वाळलेली झाडे तात्काळ पुनर्लावणी करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष न दिल्यास, सार्वजनिक निधीची उघड उधळपट्टी आणि पर्यावरणाशी खेळ झाल्याचा मुद्दा आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, आता तरी संबंधित यंत्रणा खडबडून जागी होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत





