Saturday, June 13, 2026
Homeक्राईमKopargaon : समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद

Kopargaon : समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद

6 आरोपींना अटक || कार, 6 मोबाईल व रोकडसह 9 लाख 28 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon

समृद्धी महामार्गावर धुमाकूळ घालत वाहने अडवून प्रवाशांना लोखंडी रॉडने मारहाण करून लुटणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 4 दिवसांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 6 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरलेल्या गाड्या, मोबाईल आणि रोख रकमेसह तब्बल 9 लाख 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

दि. 27 मे 2026 रोजी दुपारी लातूरचे ट्रकचालक दत्ता बाबुराव राजुळे हे आपल्या ट्रकमधून जात असताना समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक 529.9 जवळ 7 ते 8 आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी राजुळे यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्यांच्याकडील डिझेल आणि रोख रक्कम लुटली. एवढ्यावरच न थांबता या टोळीने एका वॅगनर कारला अडवून चालक आणि त्याच्या पत्नीला हत्यारांचा धाक दाखवत दमदाटी केली आणि त्यांच्याकडील 1 लाख 24 हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम लुटून नेली. त्यानंतर याच आरोपींनी आणखी एका ट्रकला लक्ष्य करत चालकाला मारहाण करून 150 लिटर डिझेल व रोकड पळवली. या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपींनी एकूण 1 लाख 50 हजार 415 रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

समृद्धी महामार्गावरील या गंभीर दरोड्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी आरोपींचा माग काढण्याचे आदेश दिल्यानंतर एलसीबीचे एक विशेष पथक तयार करून जालना आणि छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये रवाना करण्यात आले होते. व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर पोलिसांनी अवघ्या 4 दिवसांत जालना आणि कोकमठाण (कोपरगाव) येथून 6 जणांना ताब्यात घेतले.

पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने जालना, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर आणि साकुरी परिसरातील निखिल बद्रीनारायण गोरे (रा. अंबड, जालना) एक विधीसंघर्षित बालक (वय 17) शिवनाथ शांताराम आव्हाड (रा. संतनगर, शिर्डी, मूळ- वैजापूर) ओम बालाजी खरात (वय 19, रा. जालना, हल्ली- छत्रपती संभाजीनगर) राहुल राधाकिसन कोकाटे (वय 23, रा. पैठण, मूळ- बदनापूर) साईराज गणेश शहाणे (वय 21, रा. साकुरी, ता. राहाता) या आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपल्या इतर 3 साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दरोड्यात वापरलेली एक व्हेरना कार, स्विफ्ट कार, 6 मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी कोपरगाव तालुका पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, फरार असलेल्या इतर तीन आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

जयशंकर

तीन खलाशांच्या मृत्यूवर भारताची कठोर भूमिका; एस. जयशंकर यांची तीव्र शब्दात...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiओमानच्या समुद्रात भारतीय खलाशी असलेल्या जहाजांवर अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तीन भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भारत आणि अमेरिका...