मुंबई । Mumbai
राज्यातील महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असतानाही अपघातांचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून येत आहे. या सकारात्मक बदलामागे रस्ता सुरक्षा अधिकारी अभिजित वाघमारे यांनी राबविलेल्या विविध उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड व उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित वाघमारे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेसाठी दिवस-रात्र कार्यरत आहेत. महामार्गावरील अपघातांचे स्वरूप आणि कारणांचा सखोल अभ्यास करून त्यांनी अनेक अभिनव प्रयोग राबविले.
यामध्ये अवजड वाहन चालकांचे समुपदेशन, अपघातांच्या पॅटर्नबाबत जनजागृती, टेललाईट व इंडिकेटर नसलेल्या वाहनांवर निर्बंध, तसेच रात्री आणि पहाटेच्या वेळेत ट्रक चालकांना रेस्ट लेनमध्ये अनावश्यक थांबण्यास प्रतिबंध अशा उपाययोजनांचा समावेश आहे. या उपायांमुळे चालकांमध्ये सुरक्षा नियमांबाबत जागरूकता वाढली असून अपघातांच्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे.
वाघमारे यांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठीही अनेक सुरक्षा नियम तयार केले आहेत. प्रवासापूर्वी वाहनाची तपासणी, टायर व ब्रेक्सची स्थिती पाहणे, लेन बदलताना सुरक्षित अंतर राखणे, इंडिकेटरचा योग्य वापर करणे, महामार्गावर अनावश्यक थांबणे किंवा फोटोग्राफी टाळणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईनचा वापर करणे अशा सूचनांमुळे सुरक्षित प्रवासाची सवय चालकांमध्ये रुजत आहे.
अभिजित वाघमारे यांनी अपघातांचे वर्गीकरण करून ते रोखण्यासाठी त्यांनी पुढील दहा वर्षांसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार केला आहे. तसेच महामार्गांवरील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी ते एमएसआरडीसीसह विविध सरकारी यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधत असून बैठका आणि सादरीकरणांच्या माध्यमातून आवश्यक सुधारणा सुचवत आहेत.
रस्ता सुरक्षेबाबतच्या विविध मोहिमा, जनजागृती उपक्रम आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे शेकडो निष्पाप नागरिकांचे जीव वाचविण्यात मदत झाल्याचेही सांगितले जाते. वाढती वाहतूक आणि घटते अपघात यामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेचा आदर्श राज्यातील इतर महामार्गांसाठीही मार्गदर्शक ठरत असल्याची प्रतिक्रिया वाहतूक तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
रस्ता सुरक्षेबाबतच्या विविध मोहिमा, जनजागृती उपक्रम आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे शेकडो निष्पाप नागरिकांचे जीव वाचविण्यात मदत झाल्याचेही सांगितले जाते. या कामात एमएसआरडीसीचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य आणि पाठबळ लाभले. तसेच आश्मी रोड कॅरियर्सचे संचालक प्यारे खान यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याने विविध सुरक्षा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले. वाढती वाहतूक आणि घटते अपघात यामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेचा आदर्श राज्यातील इतर महामार्गांसाठीही मार्गदर्शक ठरत असल्याची प्रतिक्रिया वाहतूक तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.




