कोल्हार |वार्ताहर| Kolhar
यंत्राच्या साहाय्याने नदीपात्रातून वाळू उपशाचा विषय चिंतेचा झाला असून यापुढे नदीपात्रातील वाळू उपशाकरीता जलसंपदा विभागाची परवानगी सक्तीची करणार असल्याची माहीती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिली. भंडारदरा धरण समूहातील कालव्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, निळवंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण हापसे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, पांडुरंग खर्डे, सोपानराव शिरसाठ, अण्णासाहेब कडू, पंढरीनाथ खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे, इलियास शेख, उपसरपंच सविता खर्डे, नंदकिशोर खांदे, रवींद्र धनवटे, नितीन कुंकूलोळ, ऋषिकेश खांदे, भरत खर्डे, अनिल भणगे, दिगंबर शिरसाठ, धनंजय दळे, प्रकाश खर्डे, भगवान खर्डे, साईनाथ खर्डे, श्रीकांत खर्डे, गोरक्षनाथ खर्डे, भाऊसाहेब रांधवणे, विलास खर्डे, स्वप्निल निबे, राजेंद्र राऊत, सिद्धेश्वर विश्वासे, सुमित कापसे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले, एका पाण्याच्या थेंबातून अधिक उत्पादन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलव्यवस्थापन धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट असून त्याच दिशेने जलसंपदा विभाग काम करीत आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या प्रयत्नातून सुमारे 800 टीएमसी अतिरिक्त पाणी गोदावरी खोर्याला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने काम सुरू केले आहे. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमामुळे कालव्यांची वहन क्षमता वाढून पाण्याचा अपव्यय कमी होईल आणि शेतकर्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच शंभर वर्षांनंतर कालव्यांच्या नूतनीकरणाच्या कामाला गती मिळत आहे. या कामांमुळे कालव्यांची वहन क्षमता वाढणार असून पाण्याचा अपव्यय कमी होऊन उपलब्ध पाण्याचा अधिक लाभ सिंचनासाठी होईल.
भंडारदरा धरणाला शंभर वर्षे पूर्ण झाली असून चार्या व पोटचार्यांच्या दुरुस्तीची कामेही शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात शेतकर्यांचा पाण्यासाठीचा संघर्ष कमी होऊन उत्पादन वाढीस मदत होईल. जायकवाडी, उजनी, मुळा, कोयना तसेच तापी खोर्यातील धरणांमधील गाळ काढण्याचे धोरण राज्य सरकारने केंद्राच्या सहकार्याने हाती घेतले आहे. यामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता वाढून विविध दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पाला बळ मिळेल. कोल्हार परिसरातील विविध विकास कामांना यापुढेही निधीची कमरता भासणार नाही.
भगवतीमाता मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच रस्ते व सार्वजनिक सुविधांच्या कामांनाही प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आण्णासाहेब म्हस्के, डॉ. भास्करराव खर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी केले. सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले. आभार निळवंडे धरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण हापसे यांनी मानले.




