Saturday, April 11, 2026
HomeराजकीयSandeep Deshpande: संदीप देशपांडेंचा आशिष शेलारांवर पलटवार; म्हणाले…

Sandeep Deshpande: संदीप देशपांडेंचा आशिष शेलारांवर पलटवार; म्हणाले…

मुंबई । Mumbai

दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मनसे (MNS) आणि भाजप (BJP) नेत्यांमधील शाब्दिक युद्ध अधिक तीव्र झाले आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. शेलार यांची ‘बुद्धी चांगली होती, पण आता तिला गंज लागला’ अशा शब्दांत देशपांडे यांनी खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केलेल्या दुबार मतदारांच्या यादीवर आशिष शेलार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. ज्या याद्या मनसेने दाखवल्या, त्यातील मतदार केवळ हिंदू असल्याचे शेलार म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर संदीप देशपांडे यांनी सडेतोड पलटवार केला आहे.

देशपांडे यांनी शेलारांच्या वक्तव्यावर थेट टीका करताना म्हटले, “आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, पण आता तिला का गंज लागला, हे मला माहिती नाही.” ते पुढे म्हणाले, “कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असावा. कारण मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगले मंत्रीपद दिलेले नाही, त्यामुळे असे झाले असेल.” या शब्दांत देशपांडे यांनी शेलारांच्या सध्याच्या राजकीय स्थानावर बोट ठेवले. शेलारांनी पत्रकार परिषद घेण्यामागे नेमका काय उद्देश होता, यावरही देशपांडे यांनी टीकास्त्र सोडले. “मी आशिष शेलार यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो.”

“एकतर सध्या भाजपमध्ये त्यांना कोणी विचारत नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेले खातेही महत्त्वाचे नाही, त्यामुळे त्यांचे अपेक्षित वजन राहिलेले नाही. मुंबई प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी गमावले आहे. त्यामुळे आपण ‘चर्चेत राहिले पाहिजे’ या उद्देशाने त्यांची आजची पत्रकार परिषद होती,” अशी स्पष्ट टीका देशपांडे यांनी केली. मनसेने दाखवलेल्या यादीत केवळ हिंदूच मतदार होते, या शेलारांच्या विधानावर देशपांडेंनी जोरदार आक्षेप घेतला. “जो मतदारांचा गठ्ठा दाखवला, तो बघायला आशिष शेलार तिथे आले होते का? त्यातील मतदार हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत की जैन आहेत, हे तपासण्यासाठी शेलार उपस्थित होते का?” असा थेट प्रश्न देशपांडे यांनी विचारला.

ते पुढे म्हणाले, “आशिष शेलार यांना कोणी सांगितले की त्यात फक्त हिंदू मतदारच आहेत? आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच! मग तो ना हिंदू, ना मुस्लिम, ना शीख, ना ख्रिश्नन असतो.” मनसेने काढलेल्या प्रचंड मोर्चाचा भाजपवर परिणाम झाला आहे, असे मत देशपांडे यांनी व्यक्त केले. “आशिष शेलार ज्या पद्धतीने बावचळले आहेत, त्यावरून स्पष्ट होते की त्या प्रचंड मोर्चामुळे भाजप घाबरला आहे. त्यामुळेच शेलार पुढे आले आहेत,” असे ते म्हणाले.

संदीप देशपांडे यांनी शेलारांना एक महत्त्वाचा उलट प्रश्न विचारला आहे. “शेलार मूळात या गोष्टीशी सहमत आहेत की दुबार मतदार अस्तित्वात आहेत. जर दुबार मतदार असतील, तर ते बाद झाले पाहिजेत आणि तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, या मनसेच्या मागणीशी शेलार सहमत आहेत का? याचे त्यांनी उत्तर द्यावे,” अशी मागणी देशपांडे यांनी केली. शेवटी, त्यांनी पुन्हा एकदा विचारले, “जी दुबार मतदारांची यादी आम्ही दाखवली, त्यात फक्त हिंदूच मतदार आहेत, हे शेलार कोणत्या आधारावर बोलत आहेत?”

ताज्या बातम्या

Nashik Accident News : दुर्दैवी घटना! जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतताना...

0
पंचाळे | वार्ताहर | Pnachale सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) पंचाळे गावाजवळ (Panchale Village) आज (शनिवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास आयशर ट्रक आणि पिकअपच्या (Eicher trucks and...