Wednesday, December 4, 2024
Homeनगरसंगमनेर मतदारसंघात 122 मतदारांनी केले गृह मतदान

संगमनेर मतदारसंघात 122 मतदारांनी केले गृह मतदान

85 वर्षांवरील 98 ज्येष्ठ नागरिक तर 24 दिव्यांग मतदारांचा समावेश

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर विधानसभा मतदारसंघात गुरुवारपासून (दि.14) गृह मतदानास (होम वोटिंग) सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी 122 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 85 वर्षांवरील 98 ज्येष्ठ नागरिक तर 24 दिव्यांग मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

- Advertisement -

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही 85 वर्षांवरील व दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी नमुना 12 डी भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी गृह मतदानासाठी 252 मतदारांनी नोंदणी केली आहे.

14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान होणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या 10 पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात येणार आहे. गृह मतदानासाठी टपाली मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी तथा समन्वयक अधिकारी रामदास कोकरे, नायब तहसीलदार संदीप भांगरे, अनुप गिरी गृह मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या