संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
आ. अमोल खताळ यांचे समर्थक व भाजपचे काही कार्यकर्ते यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या संगमनेर दौर्यामध्ये खताळ समर्थक व भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये धुमचक्री उडाली. एका कार्यकर्त्याने भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकार्याच्या श्रीमुखात भडकावली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत दीपक भगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुयोग गुंजाळ व राहुल भोईर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान हे संगमनेर येथे येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते व आमदार अमोल खताळ हे शहरातील शासकीय विश्रामगृह येथे जमा झाले होते. आमदारांसोबत त्यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकारी व आमदार समर्थक यांच्यामध्ये सोशल मीडियामधून वाद झाला होता. हा वाद यावेळी अचानक उफाळून आला. विश्रामगृह येथेच हे दोघे आमने-सामने येताच बाचाबाची सुरू झाली. त्याचे रूपांतर वादात झाले. भाजप पदाधिकार्याच्या कानशिलात लगावल्याने परिसरात एकच चर्चा सुरू झाली. आता भाजप आणि शिंदे गट आमदारांच्या समर्थकांचेच वाद, असे चव्हाट्यावर येत असल्याने वादाला नवे तोंड फुटण्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पदाधिकार्यांकडून खंडण
शासकीय विश्रामगृहावर दोन भाजप पदाधिकार्यांत शाब्दिक चकमक होऊन वादावादी झाली. त्यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि आ. अमोल खताळ हे दोघेही शासकीय विश्रामगृहावर नव्हते. तरी सुद्धा काही माध्यमातून केंद्रीय मंत्री व आमदारांसमोर हा प्रकार घडला असल्याचे प्रसिद्ध झाले आहे, याचे आम्ही खंडण करतो, असे भाजप शहर सरचिटणीस राहुल भोईर, भाजपचे युवा मोर्चा जिल्हा सचिव सुयोग गुंजाळ आणि शहराध्यक्ष शशांक नामन यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.