संगमनेर (प्रतिनिधी)
शहरात अवैध गुटखा वाहतुकीविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.१७) मोठी कारवाई करत कार आणि मोपेड या दोन वाहनांसह पानमसाला आणि सुगंधित तंबाखू असा एकूण १२ लाख ९० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संजय माधव भागवत आणि विजय चंद्रकांत भागवत या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुटखा पुरवठा केल्याच्या संशयावरून नाशिक येथील दोघांचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अभिजीत अरकल, रणजीत जाधव, रमीजराजा अत्तार, आजीनाथ पाखरे यांचे पथक तयार करुन अवैध धंद्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार हे पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार पंचांसमक्ष गुंजाळवाडी रस्ता अरगडे मळा येथे सापळा रचला. यावेळी संजय माधव भागवत (वय ३८, रा. इंदिरानगर, गल्ली क्रमांक ५, म्हसोबा मंदिर परिसर, संगमनेर) हा कारमधून (क्र. एमएच. १७, बीव्ही. ९०५७) गुटखा घेऊन जाताना आढळला. त्याच्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पानमसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आली. पोलिसांनी संबंधित माल आणि वाहन असा ११ लाख ८६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारच्या मागून येणाऱ्या मोपेडवरील चालकाने पोलिसांना पाहताच वाहन (क्र. एमएच. १७, डीई.१३५८) कारच्या मागे लावून पळ काढला. या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पानमसाला आणि सुगंधित तंबाखू आढळली.
वाहनासह एकूण १ लाख तीन हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी शोध घेऊन मोपेडचालक विजय चंद्रकांत भागवत (रा. इंदिरानगर, संगमनेर) यालाही ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत संजय भागवत याने जप्त केलेला गुटखा नाशिक येथील रफिक सय्यद आणि समीर इनामदार यांच्याकडून घेतल्याची माहिती दिल्याचे सांगितले. हे दोघे सध्या फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहे.




