Saturday, May 2, 2026
HomeनगरSangamner : गुंडांच्या बंदोबस्तासाठी अमृत सेना स्थापन करणार

Sangamner : गुंडांच्या बंदोबस्तासाठी अमृत सेना स्थापन करणार

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची संगमनेरात गर्जना

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेरात गुरुवारी (दि.21) काढण्यात आलेल्या शांती मोर्चातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षपणे आमदार अमोल खताळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत गावोगावच्या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी अमृत सेना स्थापन करावी लागणार आहे, अशी धडाकेबाज गर्जना केली. त्यांच्या या वक्तव्यातून तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच पेट घेणार असल्याचे स्पष्ट झाले असून आगामी काळात आजी-माजी आमदारांमध्ये संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

- Advertisement -

कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी नुकतेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून अप्रत्यक्ष धमकी दिली होती. या वक्तव्याचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निषेध सुरू झाला असून अनेकांनी भंडारे यांच्या वक्तव्याची सार्वजनिक निंदा केली आहे. त्याचवेळी थोरात यांना हजारो कार्यकर्त्यांनी उघड पाठिंबा जाहीर केल्याने त्यांच्या बाजूने लोकसमर्थनाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात गुरुवारी सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. दुपारनंतर ही रॅली नवीन नगर रोडवर पोहोचली आणि तिथे सभेत रूपांतर झाले. यावेळी माजी मंत्री थोरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर आक्रमकपणे बोलताना दिसले. त्यांच्या भाषणातील आक्रमक सूर आणि थेट हल्लाबोलामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

त्यांनी आपल्या भाषणात संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्यावर सडकून टीका केली. तालुक्यातील गावोगाव गुंडगिरी करणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी अमृत सेना स्थापन करण्याची वेळ आली आहे, असे म्हणत त्यांनी थेट आमदारांना इशारा दिला. याशिवाय तालुक्यातील शांततेला तडा देण्याचे काम कुणी केले, तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे लागेल, असे त्यांनी कडक शब्दांत सुनावले. या सभेत आमदार सत्यजीत तांबे यांनी देखील अमोल खताळ यांच्यावर थेट हल्ला चढवत कठोर इशारा दिला. यावरुन तांबे यांनी थोरातांच्या पाठिशी उभे राहत तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळणार असल्याचे स्पष्ट केले. आता थोरात व खताळ यांच्यातील हा संघर्ष उघडपणे रस्त्यावर दिसू लागला आहे.

ताज्या बातम्या

Womens T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला...

0
मुंबई | Mumbai एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर मात करून ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष टी-२० विश्वचषकावर (Womens T20 World Cup...