Saturday, October 3, 2026
HomeनगरCrime news : लग्नाच्या वरातीत नवरदेवाच्या वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला

Crime news : लग्नाच्या वरातीत नवरदेवाच्या वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला

घारगाव । प्रतिनिधी

लग्नाचा मांडव, सनईचे सूर अन् डीजेच्या तालावर थिरकणारी वरात… सतेचीवाडीत आनंदाचा पूर आला होता. पण, तितक्यात नवरीचा मद्यधुंद चुलत भाऊ डझनभर गुंडांना घेऊन वरातीत घुसतो अन् थेट नवरदेवाच्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालतो… क्षणात वरातीचा थरार होतो. संगमनेर तालुक्यातील सतेचीवाडी (शेंडेवाडी) येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी शिवाजी यमाजी पवार (वय ४८) यांच्या मुलाचा विवाह २२ जून रोजी पार पडला होता. लग्न आटोपून रात्री ११:१५ च्या सुमारास घरासमोर वरातीचा जल्लोष सुरू होता. याच वेळी नवरीचा चुलत भाऊ मनोहर नामदेव दुधवडे (रा. पारदरा, पारनेर) हा त्याच्या १० ते १५ मद्यधुंद मित्रांसह तेथे धडकला.

त्यांनी पूर्ववैमनस्यातून किंवा किरकोळ वादातून नवरदेवाच्या नातेवाईकांना दगड आणि काठ्यांनी मारहाण सुरू केली.
​हा वाद सोडवण्यासाठी नवरदेवाचे वडील शिवाजी पवार आणि मुले योगेश व प्रदीप मध्यस्थी करायला गेले. मात्र, नशेत धुंद असलेल्या मनोहरने थेट शिवाजी पवार यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जीवघेणा प्रहार केला. तसेच इतर तरुणांनी दोन्ही भावांना गाडीच्या रॉडने बेदम चोप दिला. “पोलीस ठाण्यात तक्रार दिली, तर संपूर्ण कुटुंबाला ठार मारू” अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले.

​या प्रकरणी घारगाव पोलिसांनी मुख्य आरोपी मनोहर दुधवडे व त्याच्या १० ते १५ मित्रांवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आदिनाथ गंधाले पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या