सांगली | Sangli
‘मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार, मी कोण आहे. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री बसला आहे’ अशा शब्दात भाजपला आव्हान देणारे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी त्यांचा गड राखला आहे. सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भाजपचा सुपडासाफ केल्याचे दिसून आले.
खानापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत सुहास बाबर आणि अमोल बाबर या जोडीने भाजपच्या दिग्गज नेत्यांना धूळ चारली आहे. प्रचारादरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देत सुहास बाबर यांनी टीका केली होती. त्यानंतरही सुहास बाबर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत शिंदेसेनेचा मोठा विजय मिळवून दिला आहे.
नागेवाडी जिल्हा परिषद गटातून आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी, शिवसेनेच्या उमेदवार डॉ. शीतल बाबर या विजयी झाल्या. खानापूर तालुक्यात शिवसेनेला भरघोस यश मिळाल्यानंतर आमदार सुहास बाबरांनी शड्डू ठोकला. त्याचसोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही एकच जल्लोष केला.
सुहास बाबर यांचा विजयाचे सेलीब्रेशन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये बाबर कानाला मोबाईल लावून निकाल ऐकत होते. विजयाची बातमी कळताच त्यांनी आक्रमकपणे शड्डू ठोकून जल्लोष केला. बाबर यांच्या कृतीतून विजयाची खात्री होताच कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला.
भाजपच्या नेत्यांना दिलं होत आव्हान
निवडणुकीच्या प्रचारावेळी, आमदार सुहास बाबर आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. त्यावेळी सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत भाजपच्या नेत्यांना इशारा दिला होता. खानापुरात दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस आपणच चालवतो असे सांगत सुहास बाबर यांनी भाजपच्या नेत्यांना दमही दिला होता. आता निवडणुकीच्या निकालामध्येही सुहास बाबर हेच वरचढ असल्याचे दिसून येत आहे.
सांगली जिल्हा परिषद निकाल
भाजपा – 17
राष्ट्रवादी अजित पवार – 05
शिंदेसेना – 06
काँग्रेस – 11
राष्ट्रवादी शरद पवार – 17
शिवसेना ठाकरे पक्ष – 01
रयत क्रांती संघटना – 01
जनसुराज्य शक्ती पक्ष – 01





