पुणे | Pune
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले आहे. आज शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आणि उपचारांसाठी नेण्यात आले आहे. बारामतीमध्ये असताना सकाळी डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारीदेखील पवारांच्या गोविंदबागेत डॉक्टरांची टीम गेली होती. त्यांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे. रुबी रुग्णालयात आल्यानंतर शरद पवार कारमधून उतरून व्हिल चेअरने रुग्णालयात गेले. दरम्यान, आता शरद पवार यांच्या तपासणीचे रिपोर्ट समोर आले आहेत.
शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. पवार सध्या कोणाशीही संवाद साधू शकत नसून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
शरद पवारांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी आणि खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि हॉस्पिटलच्या नियमानुसार सगळे उपचार केले जातील, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
रोहित पवारांनी शरद पवारांबद्दल काय सांगितलं
मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो रुग्णालयात तुम्ही येऊ नका. त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही इकडे येऊ नका. त्यांना थोड्याश्या प्रमाणात कफ आहे. थोडे दिवस इथं ठेवले जाईल. ते आय सी यू मध्ये नाहीत तर खाजगी रूममध्ये दाखल आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. पवार साहेबांच्या तब्येतीबद्दल आम्ही सर्वजण रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये आलो आहोत आणि तेथील डॉक्टर अभिजीत लोढा आपल्या सर्वांना शरद पवार यांच्या प्रकृती बद्दल माहिती सांगतील.
पवारांवर उपचार करणारे डॉ. लोढा काय म्हणाले?
पवारांवर उपचार करणारे डॉ. अभिजीत लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, शरद पवार यांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून कफचा (खोकल्याचा) त्रास जाणवत होता. त्यांच्या सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या असून सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज भासलेली नाही. ते सध्या रुग्णालयातील एका खाजगी रूममध्ये विश्रांती घेत आहेत. ते सध्या सर्वांशी नॉर्मल बोलत आहेत, काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.




