Friday, June 26, 2026
HomeराजकीयSanjay Raut : देवेंद्र फडणवीसांचा टांगा पलटी करण्यासाठी शिंदेंना दिल्लीतून रसद; संजय...

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांचा टांगा पलटी करण्यासाठी शिंदेंना दिल्लीतून रसद; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई । प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणातील अंतर्गत कुरघोडी आणि शह-काटशहाचे राजकारण आता एका अत्यंत नाट्यमय वळणावर येऊन पोहोचले आहे. “एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या आडवे करण्याची पूर्ण सुपारी घेतली असून, फडणवीसांचा टांगा पलटी करण्यासाठी शिंदेंना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पाठिंबा आहे,” असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांनी महायुतीमधील अंतर्गत संघर्षावर थेट बोट ठेवत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांनी महायुतीमधील नेत्यांच्या अंतर्गत संबंधांवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, “वरवर पाहता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कसलाही वाद नसल्याचे भासविले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र चित्र पूर्णपणे वेगळे आहे. सध्या जे काही राजकारण सुरू आहे, ते पूर्णपणे भाजपअंतर्गत आहे. फडणवीसांची राजकीय ताकद कमी करण्यासाठीच दिल्लीतून शिंदेंचा वापर केला जात आहे. मात्र, फडणवीस हे काही बुद्धीबळाच्या पटावर बसलेले साधे प्यादे नाहीत, याची कल्पना दिल्लीश्वरांनाही असेल. सध्या फडणवीसांच्या चेहऱ्यावर केवळ एक खोटं हसू दिसत असून, शिंदेंना दिल्लीतून मिळणारे बळ हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, हे त्यांनाही पुरते ठाऊक आहे.”

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव आणि अपक्ष गोकुळ गिते यांच्या विजयाचा दाखला देत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “नाशिकमध्ये प्रचंड पैशांचा वापर झाला, मतदारांना धमक्या देण्यात आल्या; तरीही भाजपच्याच मतदारांनी शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध मतदान केले. हा मतदारांमधील तीव्र रोष असून तो आता उद्रेकाच्या रूपाने बाहेर पडला आहे. गोकुळ गिते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितले होते आणि आम्ही आमची मते त्यांच्याकडे वळवली, ज्याचा फायदा गितेंना विजयासाठी झाला,” असा दावाही राऊतांनी यावेळी केला.

एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवताना राऊतांनी त्यांना सडकून टोले लगावले. “शिंदेंच्या गद्दारीशी लढायला आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्हाला पैशांचा माज दाखवू नका. माणसाचे जीवन हे क्षणभंगूर असते, आज सत्ता आहे तर उद्या नसेल. अजित पवार यांचे काय झाले? हे सर्वांसमोर आहे. त्यामुळे एवढी मस्ती दाखवणे योग्य नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी सुनावले. तसेच, “आधी माझ्याशी लढा, मग उद्धव ठाकरेंशी लढा. माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते ठाकरे कुटुंबासाठी आणि पक्षासाठी जिवाची बाजी लावायला तयार आहेत, पैशांसाठी नाही,” असा इशारा देत राऊतांनी आगामी राजकीय संघर्षाचे संकेत दिले आहेत.

ताज्या बातम्या

पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांसाठी रेल्वेची खास घोषणा

0
सोलापूर | Solapur आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकर्‍यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने मोठा दिलासा दिला आहे. यंदा आषाढी वारीसाठी 54 विशेष रेल्वे...