मुंबई । Mumbai
दिल्लीच्या राजकीय वर्तुळात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि खांदेपालटाच्या चर्चांना उधाण आले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा करत राजकीय वातावरणात खळबळ उडवून दिली आहे.
“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशाचे पुढील शिक्षणमंत्री होण्यासाठी सर्वाधिक योग्य व्यक्ती आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातही तेच नाव आहे,” असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी, पक्षाचा आदेश मानण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारची शिक्षण नीती, विद्यापीठांमधील नियुक्त्या आणि भाजप नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. राऊत म्हणाले की, “गेल्या १० वर्षांत देशातील शिक्षण व्यवस्थेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. देशातील बहुतांश विद्यापीठांचे कुलगुरू हे शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित नसून, विशिष्ट विचारसरणीच्या दबावातून नेमले गेले आहेत. अशा नेतृत्वाखाली देशातील शिक्षणाला कशी झळाळी मिळणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजप नेत्यांच्या आणि केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या शिक्षणावरून राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. “केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांची आणि वरिष्ठ नेत्यांची मुले परदेशातील सुरक्षित आणि नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. दुसरीकडे, देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय सामान्य मुलांवर मात्र अपूर्ण व विस्कळीत शिक्षण पद्धती लादली जात आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
देशाच्या शैक्षणिक परंपरेचा पाढा वाचताना राऊत म्हणाले की, “पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे आधुनिक विचारांचे नेते होते. त्यांनी देशात तंत्रज्ञानाचे युग आणले तसेच ‘आयआयटी’ (IIT) आणि ‘आयआयएम’ (IIM) सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांची उभारणी केली. मात्र, गेल्या दशकात आधुनिकता बाजूला सारून शिक्षण पद्धती मागे नेण्याचे काम झाले आहे.”
“जर केंद्र सरकारला खरोखरच शिक्षण क्षेत्रात सुधारणा करायची असेल, तर नंदन निलेकणी यांच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तीला किंवा गुणवत्तेचा विचार करून देवेंद्र फडणवीस यांना शिक्षणमंत्री करावे,” असा सल्लाही त्यांनी दिला. फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य जाण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, “फडणवीस महाराष्ट्रात राहण्याचा कितीही दावा करत असले, तरी भाजपमध्ये निर्णय वरिष्ठ पातळीवरून होतात. त्यामुळे त्यांना केंद्रात जावेच लागेल,” असे भाकीत त्यांनी वर्तवले. राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.




