Tuesday, August 18, 2026
HomeराजकीयSanjay Raut : "राणे भाजपचे आश्रित, त्यांच्या टोपाचे केसही पिकलेत जरा भान...";...

Sanjay Raut : “राणे भाजपचे आश्रित, त्यांच्या टोपाचे केसही पिकलेत जरा भान…”; संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई । Mumbai

मुंबईत पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून शिवसेना (ठाकरे गट) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पाणी साचण्याच्या समस्येवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनीही चोख प्रत्युत्तर देत ठाकरे गटाला लक्ष्य केले.

- Advertisement -

नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधला. “संजय राऊत यांच्या नादाला लागू नका. ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले होते,” असा टोला राणेंनी लगावला. मात्र, या टीकेला संजय राऊत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. राणे यांच्या वयावरून खोचक टिप्पणी करत राऊत म्हणाले, “राणेंनी वयाचे भान ठेवावे. त्यांचे केस पिकले आहेत, आता प्रगल्भ वक्तव्ये करावीत.” राऊतांनी राणेंना भाजपचे “आश्रित” संबोधत स्वत:चा पक्ष काढण्याचे आव्हान दिले.

राऊतांनी राणेंवर टीका करताना उद्धव ठाकरे यांच्याकडे २० आमदार आणि ९ खासदार असल्याचा दावा केला. “भाजपकडे किती खासदार आहेत, हे मोजा. फक्त पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका,” असे म्हणत त्यांनी राणेंना खोचक टोला लगावला. याशिवाय, राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पाकिस्तानविरोधी धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मोदींनी पाकिस्तानात नवाज शरीफ यांच्यासोबत केक कापला, हे राणे विसरले का? पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याच्या गर्जना काय झाल्या?” असे सवाल राऊतांनी उपस्थित केले.

राऊतांनी राणेंना पाकिस्तानच्या मुद्द्यावरूनही आव्हान दिले. “पाकिस्तानात कोणाला पाठवायचे, हे भविष्यात ठरवू. ट्रम्प यांच्या दमकीनंतर पाकिस्तानात जाणारे सैन्य मागे का घेतले, हे राणेंनी स्पष्ट करावे,” असे राऊत म्हणाले. “ऑपरेशन सिंदूर आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याच्या घोषणा कुठे गेल्या?” असा सवाल करत राऊतांनी राणे आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

मुंबईतील पाणी साचण्याच्या समस्येने सुरू झालेला हा वाद आता राजकीय टीकाटिप्पणीच्या पातळीवर गेला आहे. आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना, भाजप नेत्यांनी ठाकरे गटाला लक्ष्य करत पलटवार केला. राणे यांनी ठाकरे गटाला “नालायक” संबोधत त्यांच्या कामगिरीवर टीका केली, तर राऊतांनी राणेंच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “राज ठाकरे यांचा स्वत:चा पक्ष आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडे चोरलेला पक्ष आहे, पण राणे हे फक्त भाजपचे आश्रित आहेत,” असे राऊत म्हणाले.

मुंबईतील पाणी साचण्याचा प्रश्न जैसे थे आहे. पावसामुळे रस्ते, गल्ल्या आणि अनेक निच्चण क्षेत्रांमध्ये पाणी भरले असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, राजकीय नेत्यांचे लक्ष या समस्येचे निराकरण करण्याऐवजी एकमेकांवर टीका करण्यातच आहे. सरकार आणि विरोधक यांच्यातील हा वाद थांबणार की आणखी तीव्र होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : दहाव्या मैलाजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

0
नाशिक | Nashik मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) दहाव्या मैलाजवळ हॉटेल अमृत पंजाब आणि गरवारे पॉईंट परिसरात आज (मंगळवारी) सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाल्याची...