Wednesday, April 8, 2026
HomeराजकीयSanjay Raut : "ट्रम्प भारत-पाक युद्ध थांबवू शकतात, मग मोदी…"; संजय राऊतांचा...

Sanjay Raut : “ट्रम्प भारत-पाक युद्ध थांबवू शकतात, मग मोदी…”; संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई । Mumbai

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर भारताने अधिकृतपणे शोक व्यक्त करायला हवा होता, असे मत मांडत राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या जागतिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

- Advertisement -

रविवारी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद जागतिक राजकारणासह भारतातही उमटले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, इराण हा भारताचा जुना आणि विश्वासू मित्र राहिला आहे. विशेषतः भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात इराणने नेहमीच भारताची पाठराखण केली आहे. अशा संकटकाळात भारताने खंबीरपणे उभे राहणे गरजेचे होते. एका मोठ्या जागतिक नेत्याची हत्या होते, तेव्हा भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी शोक व्यक्त करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे, असे राऊत यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत राऊत यांनी त्यांना ‘विश्वगुरू’ म्हणून साद घातली. “डोनाल्ड ट्रम्प जर भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध रोखण्याची क्षमता ठेवतात, तर पंतप्रधान मोदी हे देखील एक मोठे जागतिक नेते आहेत. त्यांच्यासारखा नेता आतापर्यंत झालेला नाही, असे म्हटले जाते. मग त्यांनी इस्रायल आणि इराणमधील हे भीषण युद्ध थांबवण्यासाठी आपल्या मित्रांशी संवाद का साधला नाही?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. मोदींनी केवळ पदकं स्वीकारण्यापेक्षा जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करताना संजय राऊत यांनी थेट सवाल विचारला की, भारत सरकार नक्की कोणाला घाबरत आहे? “पंतप्रधान मोदींना इस्रायलची भीती वाटते की नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची? व्हेनेझुएलाच्या प्रमुखांप्रमाणे आपलीही अवस्था होईल, अशी भीती त्यांना वाटते का?” अशा तिखट शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. मुलांच्या शाळांवर होणारे हल्ले हे ‘सैतानी कृत्य’ असून, त्याचा निषेध सर्वच स्तरांतून व्हायला हवा होता, असेही ते म्हणाले.

या युद्धाचे परिणाम केवळ आशियापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा राऊत यांनी दिला. जागतिक स्तरावर मिळणारी पदके आणि सन्मान यामुळे देशातील सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. “मोदींच्या गळ्यात लटकलेल्या मेडलमुळे देशातील महागाई कमी होणार नाही,” असा टोला लगावत त्यांनी देशांतर्गत प्रश्नांकडेही लक्ष वेधले. हे युद्ध थांबले नाही तर येणाऱ्या काळात संकट अधिक गडद होईल आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरीत परिणाम होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

व्हिएतनामची कंपनी राज्यात साडेसहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai शाश्वत नागरी विकास, औद्योगिक आणि पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात...