मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्याशेजारी आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे. यावरुन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला जिल्हाप्रमुख असलेल्या आनंद दिघेंचा फोटो लावून तुम्ही काय साध्य करताय? अशा पद्धतीने ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्याचा हा राष्ट्रीय कट आहे असा थेट आरोप ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी केला.
बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर आनंद दिघे यांचा फोटो लावल्याने संजय राऊत यांनी आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते. ते फक्त जिल्हाध्यक्ष होते. दिघे यांचा फोटो बाळासाहेबांच्या बरोबरीने का लावता? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. बाळासाहेबांचे महत्त्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “शिंदे गट ज्या जाहिराती करतो त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखाएवढाही नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला तुम्ही शिवसेना जिल्हाप्रमुखाचा फोटो लावता? तुम्हाला बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड कमी करायचा आहे का? बाळासाहेबांच्या बाजूला आणखी एक फोटो लावणे हा एक राष्ट्रीय कट आहे. बाळासाहेबांचे महत्व कमी करण्यासाठी तुम्ही या गोष्टी करताय हे जनता लक्षात ठेवते. आनंद दिघेंचा पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतोय.”
‘बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते. आनंद दिघे हे शेवटपर्यंत जिल्हाप्रमुख होते. तुम्ही जिल्हाप्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीने बसवून काय दाखवताय? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना? की बाळासाहेब ठाकरेंचं महत्त्व अजून कमी करा असा त्यांचाचा हा आदेश आहे?’ असे म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही टीका केली.
शिंदे सेनेकडून निषेध व्यक्त
संजय राऊतांनी आनंद दिघेंवर केलेल्या वक्तव्यानंतर ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. टेंभीनाका आनंद आश्रम इथे आंदोलन करत आंदोलकांनी संजय राऊतांचा पुतळा जाळला.
ठाण्याचे खासदार आणि शिंदेंच्या सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना एकेरी उल्लेख तर संताप व्यक्त केला आहे. आपल्या पोस्टमध्ये म्हस्के यांनी, “संजय राऊत, तू तर नेता–उपनेता सोड; जनतेने स्वीकारलेला लोकप्रतिनिधी सुद्धा नाहीस. तू परस्पर संधी साधून, राज्यसभेवर मागच्या दाराने गेलेला माणूस आहेस. आमच्या आनंद दिघे साहेबांविषयी जे वक्तव्य तू केले आहेस, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो!! त्याचे परिणाम तुला निश्चितच भोगावे लागतील…!” असा इशारा दिला आहे.
“आता मुलाखतीतून प्रिय म्हणून प्रेम काय दाखवतोस? दिघे साहेब जिवंत असताना तू त्यांचा किती दुःस्वास केला आहेस, याचे आम्ही साक्षीदार आहोत. तुझ्या एका मुलाखतीमुळे त्यांना टाडा लागण्याची वेळ आली होती. तू कायमच त्यांना पाण्यात पाहिलंस… आता काय खोटं प्रेम दाखवतोस? बाळासाहेब ठाकरे आम्हाला कायमच वंदनीय आहेत. पण, केवळ ठाणे नव्हे तर संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात ज्यांनी शिवसेनेच्या उभारणीच्या काळात रात्रंदिवस मेहनतीने पक्ष मोठा केला, ते तुझ्यासाठी केवळ जिल्हाप्रमुख असले तरी आमच्यासाठी तेही बाळासाहेबांप्रमाणेच दैवत आहेत,” असे म्हस्केंनी म्हटले आहे. “आत्ता फक्त इशारा देतोय… तोंड सांभाळून बोला!! फार बोललात तर परिणामांना सामोरे जायला तयार राहा,” असेही म्हस्केंनी पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




