मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) खरे सूत्रधार असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “बीडमधल्या (Beed) हत्याकांडाचे सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना त्याची लाज वाटली पाहिजे. एक नाही दोन मंत्री त्याच भागातले आहेत. त्यांनी ही हत्याकांडं घडवलेली आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांची नावं घ्यायला तुम्हाला लाज वाटते का? असा महाराष्ट्र घडवा असं या महापुरुषांनी सांगितल्याचं माझ्या स्मरणात नाही.देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी खोटं बोलणं थांबवलं पाहिजे. विरोधकांचा काटा काढण्यासाठी तुमच्याकडे गृहमंत्रिपद नाही. तसंच सहकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर पांघरुण घालण्यासाठी हे पद मिळालेलं नाही. लाडक्या बहिणींचे देवाभाऊ आहात ना? मग परळी आणि आसपासच्या परिसरातल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं आहे आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे लाडक्या देवाभाऊंनी लाडक्या बहिणी ज्या विधवा झाल्या आहेत तर कायद्याने या सगळ्याचा बदला घेतला पाहिजे,” असं संजय राऊतांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “बीडमधील चित्र अत्यंत वाईट आहे, मी एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. त्यांना अर्बन नक्षलवादाची (Naxalism) फार चिंता आहे. बीडमध्ये गेल्या काही वर्षात ३८ हत्या झालेल्या आहेत. ३८ हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या असून त्यातील बहुसंख्य वंजारी समाजाचे आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीडमधील नक्षलवाद संपवा. देवेंद्र फडणवीस यांचा अर्बन नक्षलवाद आवडता शब्द आहे.बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघातल्या ११८ बुथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिले नाही. यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवले पाहिजे. परळी हे त्याचं उदाहरण आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे घडलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अर्बन नक्षलवादाचे कमांडर आहेत. अर्बन नक्षलवाद कुणी पोसत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भाजपा पक्ष आहे”, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
कल्याणच्या घटनेवर फडणवीस, एकनाथ शिंदे गप्प का?
कल्याण (Kalyan Crime) येथील अल्पवयीन मुलीच अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, हे सगळे लोक कल्याण, अंबरनाथ आणि बीडलाच का असतात? अक्षय शिंदेच तुम्ही निवडणुकीआधी एन्काऊंटर केलं. तुम्हाला राजकीय फायदा हवा होता. आता हा जो नराधम पकडलेला आहे. ज्याने त्या मुलीची हत्या केली. लैंगिक अत्याचार करुन हत्या केली. त्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री, खासदार गप्प का आहेत?” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. कल्याण अंबरनाथ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवांचा मतदारसंघ आहे. या भागात लुटमार बलात्कार वाढले आहेत. गुंडाना अभय दिलं जातं आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.