मुंबई | Mumbai
मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता महेश कोठारे यांनी एका कार्यक्रमात सांगितले की ते भाजपाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीचे भक्त आहेत. त्यांनी म्हटले,“मी मोदी भक्त आहे, मुंबईत कमळ फुलवायचे आहे आणि माझे हे मत स्पष्ट आहे.” तसेच मुंबईत भाजपाचा महापौर होईल, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी महेश कोठारे यांची खिल्ली उडवली.
महेश कोठारे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, “ महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. आपण कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिले आहेत का? अशा वक्तव्यांनी परिणाम होऊ शकतो. तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा दाबेल.”
संजय राऊत यांनी कोठारेंच्या विधानाकडे राजकीय संदर्भातून लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, महेश कोठारेंचे हे वक्तव्य फक्त एकवेळचे नाही, तर याचा परिणाम मुंबई राजकारणात दिसेल. त्यांच्या या शब्दांमुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय म्हणाले होते महेश कोठारे?
मागाठाणे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपावर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले, “भाजपा म्हणजे आपले घर आहे, कारण मी स्वतः भाजपाचा भक्त आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही भक्त आहे.”
राजकारणावर बोलताना महेश कोठारे म्हणाले, “आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचा आहे. तसेच यावेळचा महापौरही इथून निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल…” महेश कोठारे यांच्या या विधानामुळे भाजपाने आतापासूनच मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर दावा करण्याची तयारी सुरु केल्याच्या चर्चा रंगल्या. “मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो, तेव्हा मी म्हटले होते की, ते खासदार निवडून देत नाहीत तर मंत्री निवडून देत आहे. आता या विभागातून नगरसेवक नाही तर महापौर निवडला जाईल”, असेही महेश कोठारे आपल्या भाषणात म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





