मुंबई । Mumbai
राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुण पिढी म्हणजेच Gen Z मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात घेतलेल्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात तरुणांशी संवाद साधत आहेत. मात्र, यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “भाजप हा आता पक्ष उरला नसून तो स्वतःच एक मोठा पेड इव्हेंट झाला आहे,” अशी तिखट टीका राऊत यांनी केली.
पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमाला सत्ताधाऱ्यांनी ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याचा खासदार संजय राऊत यांनी अत्यंत खरपूस समाचार घेतला. नागपुरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “काल मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की पुण्याचा कार्यक्रम पेड होता. मग आज नागपुरात देवेंद्र फडणवीसांचा जो कार्यक्रम सुरू आहे, तो काय आहे? सत्ताधारी अशा वक्तव्यांमधून देशातील विद्यार्थी आणि तरुणांचा थेट अपमान करत आहेत. मतांचे राजकारण करण्यासाठी महिलांना १५०० रुपये देणारी ‘लाडकी बहीण योजना’ काय होती? तोही तर एक पेड इव्हेंटच होता ना! बिहारमध्ये दिलेले १०-१० हजार रुपयेही पेड इव्हेंटच होते.”
राऊत पुढे म्हणाले की, “नागपुरात फडणवीसांच्या कार्यक्रमाला जाणारे तरुण १०० टक्के ‘पेड’ आहेत. राहुल गांधी यांनी पुण्यात जाऊन आजच्या तरुण पिढीचे वास्तव प्रश्न समजून घेतले. मात्र, या सरकारला तरुणांच्या वेदना अजूनही कळलेल्या नाहीत. राहुल गांधींच्या कालच्या यशस्वी कार्यक्रमानंतरच घाबरलेल्या सरकारला नागपुरात असा घाईघाईने कार्यक्रम घेण्याची बुद्धी सुचली आहे.”
केवळ तरुणांच्या मुद्द्यावरच नव्हे, तर राज्यातील शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारावरूनही संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. आंबेगाव तालुक्यातील एका शाळेचे उदाहरण देत ते म्हणाले, “तिथे विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे भोजन आणि कच्चे धान्य पुरवले जात आहे. कुकरच्या १३ शिट्ट्या घेतल्या तरी वाटाणा शिजत नाही, अशी परिस्थिती आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आणणाऱ्या रेश्मा पारधी या धाडसी अंगणवाडी शिक्षिकेला सरकारने थेट निलंबित केले होते. नंतर जनतेच्या तीव्र दबावामुळे त्यांना सेवेत परत घ्यावे लागले, हे ठीक आहे. पण आता मुख्यमंत्र्यांनी तो न शिजणारा वाटाणा स्वतः खाऊन दाखवावा आणि फडणवीसांनी ते धान्य आपल्या घरी नेऊन शिजवून दाखवावे,” असे उघड आव्हानच राऊत यांनी दिले.
दरम्यान, राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापले असून आगामी काळात तरुण मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असाच सामना रंगण्याची चिन्हं आहेत.




