मुंबई । Mumbai
राहुल गांधी यांच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणावरील मांडणीवरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले आहे. राहुल गांधी देशातील तरुणांना गुंतागुंतीचे विषय सोप्या भाषेत समजावून सांगत असल्याचा दावा करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधींची खिल्ली उडवली जात असेल, तर त्यामागे राजकीय अस्वस्थता असल्याचा दावा राऊत यांनी केला.
माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण हे सामान्य नागरिकांसाठी किचकट विषय आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांना हे विषय सोप्या भाषेत जनतेसमोर मांडावे लागतात. राहुल गांधी सध्या तरुणांशी संवाद साधत हे मुद्दे मांडत असल्याचे राऊत यांनी म्हटले. त्यांच्या या भूमिकेवर फडणवीस टीका करत असतील, तर त्यातून भाजपची भूमिका स्पष्ट होते, असा दावा त्यांनी केला.
यावेळी राऊत यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या राजकीय टोमण्यांचाही उल्लेख केला. राहुल गांधींना ‘पप्पू’ म्हणून हिणवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला, मात्र आता राहुल गांधीच मोदींना ‘पप्पू’ ठरवत असल्याचे राऊत म्हणाले. राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींच्या कथित मिमिक्रीवरूनही फडणवीस यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली होती. राहुल गांधींनी राजकारण सोडून स्टँडअप कॉमेडी करावी, अशी खोचक टिप्पणी फडणवीस यांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी मोदी आणि भाजप नेत्यांकडून विरोधकांची खिल्ली उडवली जात असल्याचा आरोप केला.
पंतप्रधानांच्या सार्वजनिक कार्यक्रमांतील शैलीवरही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. मोदींनी यापूर्वी नेहरू, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली असल्याचा उल्लेख करत, लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार विरोधकांना असल्याचे ते म्हणाले. “पंतप्रधानांवर टीका करायची नाही, असे संविधानात कुठे लिहिले आहे? लोकशाहीत जनतेतून निवडून आलेल्या प्रत्येक नेत्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे,” असे राऊत यांनी म्हटले.




