मुंबई | Mumbai
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान आज १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये आमनेसामने येणार आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार असून संपूर्ण देशभरातून या सामन्याला विरोध होत आहे. या सामन्यावर भारतीय क्रिकेट संघाने बहिष्कार टाकायला पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये थोडी जरी देशभक्ती शिल्लक असेल तर त्यांनी हा सामना थांबवला पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी फक्त पैशांसाठी हा सामना खेळवला जात असल्याचा आरोप केला.
शिवसेना ठाकरे गटाकडून या सामन्याच्या विरोधासाठी आज राज्यभरात ‘माझं कुंकू, माझा देश’ अभियान राबवण्यात येत आहे. आता या सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारसह भारतीय खेळाडूंवर जोरदार हल्लाबोल केलाय.
भाजप के पापा वॉर रुकवा सकते है, मगर मॅच नही रोक सकते
संजय राऊत म्हणाले की, मोदी-शाहांची ही राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगाम हल्ल्यात ठार झालेल्या 26 लोकांच्या बायकांच्या कपाळावरचा सिंदूर पुसला गेला. मोदींनी छाती पिटण्याचा कार्यक्रम केला. भारताने याआधी अशा आंतरराष्ट्रीय सामन्यातून माघार घेतली आहे. पण जय शहा यांचा त्यात इन्ट्रेस्ट आहे. मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही. भाजप के पापा वॉर रुकवा सकते है, मगर मॅच नही रोक सकते है. ट्रम्प के दबाव मै, हिंदुस्तान पाकिस्तान का वॉर भी रोक सकते है, हा नक्की असा कोणता पैशाचा खेळ आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
क्रिकेटपटूंना लाजा वाटल्या पाहिजे, त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती नाही का?
संजय राऊत पुढे म्हणाले की, हा सामना खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना लाजा वाटल्या पाहिजे. त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती नाही का? मॅच खेळले नसते तर जय शाह फासावर लटकवणार होते का? आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नखवी आहेत. त्यांच्या हाताखाली आशिष शेलार काम करतात. नैतिकतेच्या दृष्टीने त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता. अमित शाह आम्हाला शिकवणार? अमित शाह, एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब असते तर दुबईचा आजचा सामनाही झाला नसता, असेही त्यांनी म्हटले.
अजित पवारांवर सडकून टीका
अजित पवारांच्या विधानावर संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले. अजित पवारांवर टीका करताना ते म्हणाले, अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त वाहत आहे. अजित पवार अर्धे पाकिस्तानी आहेत. महाराष्ट्राचा मंत्री जर भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची भाषा नाही. पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्या २६ लोकांमध्ये तुमच्या घरातील कुणी असते तर तुम्ही असे बोलला नसतात. जर त्या २६ लोकांमध्ये तुमचा एखादा ठेकेदार जरी असता, तरी तुम्ही हे बोलला नसता.
सौरभ द्विवेदीच्या पत्नीचा आक्रोश ऐका
या सामन्याच्या विरोधात आंदोलनाची व्याप्ती देशभरात पसरली आहे. काल आपने दिल्लीत आंदोलन केले. आज पण आंदोलने होतील. सौरभ द्विवेदींच्या पत्नीचा आक्रोश ऐका. तुमची अशी काय मजबूरी आहे की, सामना खेळावा लागतोय. भारत-पाक सामन्याच्या विरोधापासून लक्ष हटवण्यासाठी मोदींनी मणिपूर दौरा केला, असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.
ज्या रेस्टॉरंटमध्ये हे सामने दाखवले जातील, त्यांची नावे सार्वजनिक केली जातील. लोकांपर्यंत पोहोचवली जातील. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची विक्री होत नाही. पण गॅम्बलिंग होणार. दुबईत जय शाह बसलेले आहेत. मनी लाँन्ड्रिंग होणार. हे सर्व होणार.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




