Monday, August 17, 2026
HomeराजकीयSanjay Raut : अमेरिका-इराण शस्त्रसंधीवरून राऊतांचा मोदींवर निशाणा; म्हणाले, "वॉर रुकवा दी...

Sanjay Raut : अमेरिका-इराण शस्त्रसंधीवरून राऊतांचा मोदींवर निशाणा; म्हणाले, “वॉर रुकवा दी म्हणत होते पण…”

मुंबई । Mumbai

गेल्या ४० दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला असून दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या युद्धविरामात शेजारील देश पाकिस्तानने महत्त्वपूर्ण मध्यस्थी केल्याचे अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी मान्य केल्याने भारताच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांनी या घडामोडीवरून केंद्र सरकारला धारेवर धरताना म्हटले की, जे ‘वॉर रुकवा दी’ (युद्ध थांबवले) असा दावा करत होते, त्यांच्या नाकाखालून पाकिस्तानने जागतिक राजकारणात आपले वजन वाढवले आहे. रशिया-युक्रेन युद्ध अद्याप सुरूच असताना, आता अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्याचे श्रेय पाकिस्तानला जाणे, ही मोदी सरकारसाठी मोठी चपराक असल्याचे राऊत यांनी नमूद केले. “जे श्रेय ‘विश्वगुरू’ म्हणून भारताला मिळायला हवे होते, ते आज पाकिस्तानला मिळाले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करताना राऊत म्हणाले की, जेव्हा जग विनाशाच्या उंबरठ्यावर होते आणि शांततेसाठी मध्यस्थीची गरज होती, तेव्हा पंतप्रधान मोदी देशांतर्गत राजकारणात व्यस्त होते. केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमध्ये विरोधकांवर ‘राजकीय शब्दांचे बॉम्ब’ टाकण्यात ते मग्न होते. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याचे काम सुरू असताना, तिकडे चीन आणि पाकिस्तानने जागतिक शांततेचे श्रेय लाटले आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

यावेळी राऊत यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भाजपच्या जुन्या घोषणांची आठवण करून देत सरकारला टोला लगावला. जे इस्लामाबाद ताब्यात घेण्याच्या बाता मारत होते, त्याच इस्लामाबादमध्ये आता इराण आणि अमेरिकेची महत्त्वाची शांतता बैठक होणार आहे. ही बाब भारतासाठी आणि मोदी सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणी असल्याचे त्यांनी म्हटले. पाकिस्तानला आज जी जागतिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, त्याला सर्वस्वी पंतप्रधान मोदींचे परराष्ट्र धोरण जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला.

इराणच्या प्रतिकाराचे कौतुक करताना संजय राऊत म्हणाले की, इराणने अमेरिका आणि इस्रायलसारख्या महासत्तांसमोर गुडघे टेकले नाहीत. ३५ दिवसांहून अधिक काळ त्यांनी या शक्तींना झुंजवत ठेवले. इराणने जगाला दाखवून दिले की, आपल्या देशाच्या सार्वभौमत्वासाठी जनतेने आणि राज्यकर्त्यांनी कसे बलिदान द्यावे लागते. या युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले असले, तरी इराणने अमेरिकेची ‘फालतू भीती’ मोडीत काढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नेत्याला इराणने धडा शिकवला असून, भारताने या परिस्थितीतून धडा घेण्याची गरज असल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या