मुंबई | Mumbai
काल (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते दिल्लीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, या पुरस्कार सोहळ्यावरून आता महाराष्ट्रात राजकीय धुसफूस सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना फोडणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी पुरस्कार दिल्यावरून संताप व्यक्त करत शरद पवार, एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर निशाणा साधला आहे. ते मुंबईत आज माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) फार विचित्र दिशेने चालले आहे. कोण कोणाला टोप्या घालतंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहांच्या मदतीने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता याच्यामुळे मराठी माणसाच्या मनाला वेदना झाल्या”, असेही त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,”महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोण-कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे ठीक आहे. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभीमानाला धक्का लावणारं आहे. ही आमच भावना आहे, कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकेल. पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाही. कारण शरद पवारांचा आम्ही आदर करतो. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगु होत असेल, तो तुमचा कौटुंबिक प्रश्न आहे. अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं, याचं भान राखून आम्ही पुढचं पाऊल टाकतो”, असंही संजय राऊतांनी म्हटले.
तसेच “दिल्लीतील (Delhi) साहित्य संमेलन म्हणजे दलाली सुरु आहे, ती राजकीय दलाली सुरु आहे. कोणालाही कसलेही पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसेही सत्कार करत आहेत. यांचा साहित्याशी संबंध काय आहे? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीत दलाली करायला आला आहात का, काय साहित्याची सेवा करत आहात, कोण करतंय संमेलन आयोजित. हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपद्व्याप आहे. मराठीची काय सेवा केली तुम्ही? महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्यांचा सत्कार करता तुम्ही? हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतील दलाली आहे. मलाही याचं आमंत्रण असून मी येथे जाणार आहे. जो मराठी माणूस आहे, तो जाणार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.