मुंबई । Mumbai
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटावर ‘नरकासुर’ अशी बोचरी टीका केली आहे. नरकचतुर्दशीच्या तिथीचा उल्लेख करत त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना गुवाहाटीतील बंडखोरीवरून लक्ष्य केले.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “आज नरकचतुर्दशी आहे. नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला. हे नरकासुर इथे आहेत आणि गुवाहाटीला जाऊन पूजा करतात.” शिंदे गटाचे आमदार ज्या पद्धतीने गुवाहाटीला जाऊन ‘पूजा-अर्चा’ करतात, त्यावरून त्यांनी थेट ‘नरकासुराचा जन्म’ गुवाहाटीला झाला, असा टोला लगावला.
संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारवर अंधश्रद्धा आणि मंत्र-तंत्रावर विश्वास ठेवण्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “जे सरकार गुवाहाटीत रेड्यांचे बळी देऊन निर्माण झाले, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? ज्या राज्यांचे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान विज्ञानापेक्षा तंत्र, मंत्र, यंत्र यावर विश्वास ठेवतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?” पंडित नेहरू यांनी देशाला विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे नेले, पण हे लोक देशाला मागे खेचून जनतेला श्रद्धा आणि अंधश्रद्धेत अडकवून ठेवत आहेत. “५० रेड्यांचे बळी देऊन हे सरकार सत्तेत आले आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका करताना, राज्यात आता ‘मनोमिलन’ नावाचे नाटक सुरू आहे, असे म्हटले होते. याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी शिंदेंच्या वाचनावरच प्रश्नचिन्ह उभे केले. राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचे वाचन वाढले असल्याचे दिसते, मराठी वाचता येते. त्यांना माझा प्रश्न विचारा: ‘भाऊबंदकी’ नाटकाचे लेखक कोण? हे नाटक कोणत्या साली आले? हे नाटक आपण पाहिले काय?”
शिंदे यांनी अशोक सराफ यांच्या ‘सारखं छातीत दुखतंय’ या नाटकाचाही उल्लेख करत विरोधकांच्या पोटात दुखत असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना राऊत यांनी ‘भाऊबंदकी’ नाटकाचे लेखक प्रभाकर खाडिलकर असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात ‘भाऊबंदकी’ आहे तोपर्यंत हे राज्य आपले होणार नाही. मराठी लोकांनी एकत्र आले पाहिजे.” या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा मराठी एकजुटीचा मुद्दा अधोरेखित केला.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर संजय राऊत यांनी केलेल्या या आक्रमक टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. शिंदे गटाकडून राऊतांच्या ‘नरकासुर’ टीकेला काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



