मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.शिवसेना शिंदे गटानेही राऊतांवर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांचा सत्कार होणे ही आनंदाची गोष्ट असून उद्या संजय राऊत आशा भोसलेंनादेखील देशद्रोही ठरवणार का, असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला.
संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरुन संजय राऊतांनी टीका केली आहे. त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी भाष्य केले. शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. आपल्या महाराष्ट्रातील माणसाचा सत्कार होतोय ही अभिमानाची बाब आहे. संजय राऊत हे शकुनी आहेत. महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही फुटण्यास संजय राऊतच कारणीभूत असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला. अनेक मुख्यमंत्र्यांच्या भेटी शरद पवार यांनी घेतल्या. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा त्यांनी केली. संजय राऊत यांना चर्चा नको. यांना फक्त राजकारण पाहिजे. गेल्या अडीच वर्षात यांनी काहीच केले नाही. अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांना डांबून ठेवण्याचे काम केले. राऊत हे राजकारणातील खलनायक आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, संजय राऊत यांनी ज्या भाषेने साहित्य संमेलनाला बोलले ते चुकीचे आहे. दलाल आहेत म्हणता. राऊतला साहित्य संमेलन कळले का. सामनात येण्यापूर्वी नागडे उघडे फोटो छापणारा हा पत्रकार आहे. त्यांचा निषेध केला पाहिजे. त्यांना जोडे मारले पाहिजे. संजय राऊतचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय हाच त्यावर उपाय आहे”, असे संजय शिरसाट म्हणाले.
“एकनाथ शिंदे हे खान्दानी आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पेलणारा नेता. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांचा गौरव केला. हा शिंदेंचा बहुमान आहे. तुम्ही फक्त दलाली करत आहात. टीका करून दिवसाची सुरुवात कशी करायची, इतरांना कसे वाईट बोलायचे हाच त्यांचा धंदा आहे. महाविकास आघाडी राहिली कुठे. यांना काँग्रेस विचारते कुठे, राष्ट्रवादी यांना विचारते कुठे. तीन महिन्यात मातोश्रीला कोणी गेलेय का. हेच सिल्व्हर ओकवर जातात. हे आता एकटेच पडणार आहेत. यांचा अंत ठरला आहे”, असेही संजय शिरसाटांनी म्हटले.
शरद पवार, आशा भोसलेंना गद्दार म्हणायला कमी करणार नाही
“मराठी महिला म्हणून प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. यांना हे कळत नाही. उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांना गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. यांच्या विरहित कार्यक्रम केला तर गद्दार. गद्दार शब्द चिटकवण्याची त्यांच्याकडे स्पर्धा लागली आहे. चांगल्या माणसाने चांगले काम केलेले त्यांना आवडत नाही. आशा भोसले जेव्हा शिंदेंचे कौतुक करतात तेव्हा आपला शिवसैनिक कोणत्या स्तरावर गेला याचे त्यांना कौतुक नाही. जे त्यांना सोडून जातील ते सर्व यांच्या नजरेत गद्दार आहेत. मग शरद पवारांवरही गद्दारीचा शिक्का लागला की काय असा प्रश्न पडतोय. कोण आहे संजय राऊत. काय अस्तित्व आहे. कधी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा लढलीय का. त्यांना काय माहीत आहे. भाषण करणे वेगळे आणि तळागाळात जाऊन काम करणे वेगळे. ते फक्त पोपटपंची करतात”, अशी टीका ही संजय शिरसाटांनी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा