Monday, July 22, 2024
HomeनाशिकVideo : "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…" संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान

Video : “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…” संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

- Advertisement -

दर वर्षीप्रमाणे यंदाही त्र्यंबकेश्वरमधून (Trimbakeshwar) संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज (Sant Nivruttinath Maharaj) यांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या (Pandhrpur) दिशेने भक्तीमय वातावरणात प्रस्थान ठेवले. पहाटेच्या सुमारास पारंपारिक पूजा विधि झाल्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली.यावेळी वारकऱ्यांच्या विठुरायाच्या जयघोषांनी त्र्यंबकनगरी दुमदुमुनी गेली होती.

हे देखील वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात होणार सहभागी

पहाटे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिरात पूजा विधी झाल्यानंतर पालखी सजवण्यात आली होती. सनई चौघडे आणि टाळ-मृदुंगाचा गजर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो वारकरी, त्यांच्या हातात असलेले भगवे ध्वज आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” चा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी पानाफुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची मुर्ती व पादुका ठेवण्यात आल्या होत्या. तसेच रथास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

हे देखील वाचा : Nashik News : शहर पोलीस भरतीला पहिल्याच दिवशी २१६ उमेदवारांची दांडी

तर रथाच्या पुढे मानाच्या संत निवृत्तिनाथ समाधी संस्थान, श्री. देहकुर महाराज दिंडी, श्री बेलापूरकर महाराज दिंडी, श्री. डावरे महाराज दिंडी यांच्या दिंड्या होत्या. तसेच रथाच्या मागे मानाच्या दिंड्या अतिशय शिस्तबद्ध रित्या सहभागी झाल्या होत्या.दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाथांच्या मंदिरासमोरुन पालखीचे प्रस्थान झाले. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचा सर्वात लांब पल्ल्यांच्या पालखीमध्ये समावेश होतो.त्यामुळे या पालखीला विशेष महत्त्व आहे. याशिवाय संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे बंधू म्हणून देखील निवृत्तिनाथ महाराज यांचे वारकरी संप्रदायामध्ये एक वेगळे स्थान असल्याने या वारीत सहभाग घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून वारकरी येत असतात.

हे देखील वाचा : रेल्वे रुळावरून विद्यार्थ्यांचा प्रवास

दरम्यान, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज वारकरी भजनी मंडळातर्फे दरवर्षी पालखीसमवेत असलेल्या दिंड्या व भाविकांची व्यवस्था केली जात आहे. लोकवर्गणीतून वारकरी भाविकांना विविध सेवा पुरवितात.मात्र,यंदा शासनातर्फे निर्मलवारीसाठी सव्वादोन कोटींची मंजुरी मिळून जिल्हा परिषदेकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. यानिधीतून पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, फिरती प्रसाधनगृहे व दिंडी मार्गातील मुक्काम व्यवस्था यासाठी ही रक्कम खर्ची पडणार आहे. एकूणच वारी सर्वदृष्ट्या सुविधेसह हायटेक होत असल्याचे चित्र यावर्षी पहावयास मिळणार आहे.

हे देखील वाचा : आठवड्यासाठी नाफेडचा कांदा दर 2,555 रुपये

असा आहे पालखीचा प्रवास

आज निवृत्तिनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून निघून दोन किलोमीटरवरील श्री पंचायत महानिर्वाण आखाडा,पेगलवाडी येथे मुक्कामी असणार आहे. याठिकाणी त्र्यंबकेश्वरचे भाविक व मंडळे या पालखीची भोजन व्यवस्था करतील. यानंतर शुक्रवारी (दि.२१) रोजी सकाळी सातला स्नान व पूजा झाल्यावर पालखी दरमजल करीत महिरावणी येथे दुपारी जेवणासाठी थांबेल. सायंकाळी सातपूर येथे मुक्कामी थांबेल. त्यानंतर पिंपळगाव बसवंत येथील भाविक रात्रीचे जेवण देतील. शनिवारी (दि.२२) नाशिक शहरात पालखी सकाळी नऊला प्रवेश केल्यावर त्र्यंबक रोडवरील पंचायत समिती कार्यालयासमोर नाशिककर पालखीचे स्वागत करतील. दुपारी बाराला काजीपुरा नामदेव विठ्ठल मंदिरात व तेथून गणेशवाडी, नवीन भाजी मार्केट येथे मुक्कामी थांबेल.

तसेच रविवारी (दि.२३) सकाळी अकराला नाशिक रोड येथून सायंकाळी पळसे येथे मुक्कामी पोहचेल. तेथून खंबाळे,पारेगाव, गोगलगाय, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगराळ व अहमदनगर येथे ३ जुलैला निवृत्तिनाथ महाराजांचा समाधी सोहळा सकाळी दहा ते बारापर्यंत होईल. तेथून मुक्कामी साकत, घोगरगाव, मिरजगाव, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंबर, दगडीअकोले, करकंब, पांढरीचीवाडी, चिंचोली व पंढरपूर असा मुक्काम करीत पोहचणार आहे. यात २५ जूनला सिन्नरलगतच्या दातली येथे व १६ जुलैला वाखरी येथे रिंगण सोहळा होईल. यानंतर १७ ते २० जुलैला पंढरपूरला पालखीचा मुक्काम असणार असून निवृत्तिनाथ मठ पंढरपूरला व नंतर पालखी माघारी निघेल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या