बीड | Beed
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले. या प्रकरणात फरार असणाऱ्या तिन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्याची माहिती मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे पकडल्याची सूत्रांकडून माहिती आहे. काही वेळात नेमके कोणत्या आरोपींना पकडले आहे, हे स्पष्ट होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संतोष देशमुखचे लोकेशन देणाऱ्या संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी २५ दिवसांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. एकूण तिघाजणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या केल्यानंतर हे सर्व आरोपी फरार होते, आता पोलिसांनी एका संशयितासह दोन फरार आरोपींना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्याचे सांगितले जात आहे. अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
अटक केल्यानंतर पोलीस आता या दोन्ही आरोपींचा सहभाग नेमका कसा होता याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील. तसेच आतापर्यंत हाती लागलेले धागेदोरे आणि त्यांच्या चौकशीत येणारी माहिती जुळवण्याचा प्रयत्न असेल.
सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील विष्णू चाटे, महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले यांना अटक केली होती. मात्र, २६ दिवस झाले मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तिघेजण फरार होते. या तिघांना पोलिसांनी ‘वॉन्टेड’ घोषित करत पकडून देणाऱ्यास बक्षीसाची घोषणाही केली होती. कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे, तर इतर दोघांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे त्यांना आज कोर्टात देखील हजर केला जाईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख सुदर्शन घुले आरोपी आहे आणि सुधीर सांगळे हा सहआरोपी आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी डॉक्टर संभाजी वायभसे यांनी या आरोपींना पळून जाण्यामध्ये मदत केली होती, त्याला नांदेडमधून ताब्यात घेतले. त्यानंतर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घुले आणि सांगळेला अटक करण्यासाठी फिल्डिंग लावली. त्यानंतर घुले आणि सांगळेला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत.
२६ वर्षीय सुदर्शन घुले याच्यावर १० वर्षात १० गुन्हे दाखल आहेत. केज पोलिसात तब्बल ८ गुन्हे दाखल आहेत. मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तर २२ वर्षीय सुधीर सांगळे याच्यावर आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे.
दरम्यान, यासंदर्भातली लवकरच पत्रकार परिषद होणार आहे, याबाबतची माहिती अद्याप अधिकृत नसली तरी देखील, गेल्या २६ दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी होते. जे पळून जाण्यात यशस्वी झाले होते, त्यांना पकडण्यासाठी तीन टीम काम करत होत्या. मात्र, आज या दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आला आहे.