मुंबई । Mumbai
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत.
याचदरम्यान संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे. धनंजय देशमुख आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीपूर्वी त्यांनी याचिका मागे घेतली आहे.
धनंजय देशमुख यांनी वकील ॲड. शोमितकुमार व्ही. साळुंके यांच्याद्वारे पुढील तपासाबाबत न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला दिशा देण्याबाबत याचिका दाखल केली होती. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या नेटवर्कचे सर्व पाळेमुळे, राजकीय लागेबांधे तथा जिल्हा प्रशासनात होणारा राजकीय हस्तक्षेप व संघटित गुन्हेगारीला मिळणारा राजकीय वरदहस्त तथा हस्तक्षेप कमी व्हावा यांबाबत ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिव गृह मंत्रालय (राज्य शासन) व पोलीस प्रमुख यांना द्यावे, आदी मागण्या करण्यात आलेल्या.
धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांचे संबंध पाहता अपहरण व हत्येच्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा दबाव होणार नाही, याबद्दल पावले उचलत राज्य शासनाला, त्यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे राज्य सरकारमधील मंत्रीपद तूर्तास काढून घेत सदरील घटनेचा तपास जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत त्यांना मंत्रिपदापासून कायम दूर ठेवण्याचे आदेश द्यावे, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली होती.
माध्यमांसोबत बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, सध्या सुरू असलेल्या तपासावर समाधानी आहे. यामुळे त्यांनी ही याचिका वकीलामार्फत मागे घेतली आहे. दरम्यान, आज धनंजय देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.