Tuesday, July 14, 2026
Homeमहाराष्ट्रSantosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिला आरोपी येणार बाहेर,...

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिला आरोपी येणार बाहेर, कोर्टाकडून विशेष परवानगी; नेमकं कारण काय?

बीड । Beed

संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्वाचा आरोपी जयराम चाटे तब्बल १४ महिन्यांनंतर काही तासांसाठी कारागृहाबाहेर येणार आहे. आपल्या धाकट्या भावाच्या निधनानंतर होणाऱ्या उत्तरकार्यासाठी (धार्मिक विधी) उपस्थित राहण्याकरिता न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात जाण्याची विशेष परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे हे संवेदनशील प्रकरण पुन्हा एकदा राज्याच्या चर्चेत आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे २ मार्च रोजी तांबवा गावात निधन झाले होते. हिंदू धर्मशास्त्रानुसार निधनानंतरचा बाराव्या दिवसाचा विधी महत्त्वाचा असल्याने, या विधीला उपस्थित राहण्यासाठी चाटेच्या वकिलांनी जिल्हा व विशेष न्यायालयात परवानगीचा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर ६ मार्च रोजी सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी आरोपीच्या जामीनवजा रजेला कडाडून विरोध दर्शवला होता. मात्र, कौटुंबिक आणि धार्मिक बाजूंचा विचार करून न्यायालयाने आरोपीला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पोलीस बंदोबस्तात तांबवा येथे जाण्यास संमती दिली.

न्यायालयाने ही परवानगी देताना काही कडक अटी घातल्या आहेत. आरोपी जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचा सर्व खर्च स्वतः भरावा लागणार असून, विहित वेळेत पुन्हा कारागृहात हजर होणे बंधनकारक आहे. तसेच, या काळात न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १४ महिन्यांच्या प्रदीर्घ कारावासानंतर आरोपी पहिल्यांदाच गावाकडे येणार असल्याने परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात राहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, आरोपीला मिळालेल्या या सवलतीवर मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. “हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून संपूर्ण महाराष्ट्र याकडे लक्ष देऊन आहे. आरोपींची पार्श्वभूमी पाहता, धार्मिक विधीच्या वेळी गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आरोपी खालच्या पातळीवर जाऊन पुन्हा काही अनुचित प्रकार करू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणात ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनीही कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर लक्ष वेधले होते. पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रवासाची आणि वास्तव्याची जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी सूचित केले आहे. सव्वा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या केसमध्ये आरोपीला मिळणारी ही काही तासांची सूट पीडित कुटुंबासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. आता पोलीस प्रशासन या काळात तांबवा गावात कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था हाताळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या