मुंबई | Mumbai
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) आणि सहआरोपी सुधीर सांगळेला (Sudhir Sangle)काल रात्री पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. तर कृष्णा आंधळे हा एक आरोपी अजूनही फरार असून त्याच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना झाली आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि सुधीर सांगळे (Sudhir Sangle) हे देशमुख यांचा खून झाल्यापासून फरार झाले होते. त्यानंतर काल त्यांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले,सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हे नेमके कोण आहेत? तसेच त्यांच्यावर आतापर्यंत किती गुन्हे दाखल आहेत? याबाबतची माहिती समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचे वय २६ वर्ष असून तो बीडमधील केजच्या टाकळी गावचा रहिवाशी आहे. सुदर्शनचे शिक्षण इयत्ता सातवीपर्यंत झाले आहे. सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. तसेच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजूरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा. सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख असल्याचे बोलले जात आहे.सुदर्शनवर १० वर्षांत १० गुन्हे दाखल आहेत.यामध्ये मारहाण, अपहरण, चोरी, खंडणी आणि खुनाचा प्रयत्न तसेच फूस लावून पळवून नेल्याचे गुन्हे दाखल आहेत.
त्यानंतर आता सरपंच हत्याप्रकरणी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Murder Case) दुसरा आरोपी सुधीर सांगळे हा असून त्याचे वय २२ वर्ष आहे. या हत्या प्रकरणात आरोपी सांगळेवर खुनातील सहभागाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या हत्या प्रकरणातील तिसरा फरार आरोपी कृष्णा आंधळे हा असून त्याच्यावर चार वर्षांमध्ये सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.