Sunday, September 6, 2026
HomeनगरAhilyanagar : सारोळा-विसापूर हायस्पीड चाचणी यशस्वी

Ahilyanagar : सारोळा-विसापूर हायस्पीड चाचणी यशस्वी

नगर रेल्वेला मिळणार सुपरफास्ट गती || ताशी 130 किमी वेगाने गाड्या धावणार

अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्याच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या मनमाड-नगर-दौंड दुहेरीकरण प्रकल्पाला मोठे यश मिळाले असून सारोळा ते विसापूर या 16.20 किलोमीटर रेल्वेमार्गावरील सहाव्या टप्प्याची हायस्पीड चाचणी शनिवारी (30 मे) यशस्वीरीत्या पार पडली. या यशस्वी चाचणीमुळे नगरच्या रेल्वे वाहतुकीला आता सुपरफास्ट गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त गुरू प्रकाश, मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनेश कुमार गुप्ता, मुख्य अभियंता बी. के. सिंह, उपमुख्य अभियंता सागर चौधरी, सहाय्यक कार्यकारी अभियंता राजनारायण सैनी, अजय सिंह, धर्मेंद्र कुमार, वरिष्ठ विभाग अभियंता आर. डी. सिंह, अजय राणा, एस. के. सिंह, सुद्धांसू कुमार, प्रगती पटेल, परशुराम राठोड, धम्मरत्न संसारे, रामजी कुमार आणि प्रशांत कुमार आदी अधिकारी उपस्थित होते. मनमाड-नगर-दौंड रेल्वेमार्गावरील एकूण 236.610 किलोमीटर दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या रेल्वे सेवेत ऐतिहासिक बदल घडणार आहेत. अनेक वर्षांपासून सिंगल लाईनमुळे रेल्वेगाड्यांना क्रॉसिंगसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती. दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार असून प्रवाशांना अधिक सुरक्षित, गतिमान आणि वेळेवर सेवा मिळणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून नगर-दौंड द्रुतगती डबल लाईन रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या मार्गाचे आधुनिकीकरण करण्यात आले असून संपूर्ण मार्गावर विद्युत रेल्वे सेवा सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. भविष्यात या मार्गावर रेल्वेगाड्या ताशी 130 किलोमीटर वेगाने धावू शकतील, अशी क्षमता विकसित करण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या हायस्पीड ट्रायलदरम्यान ट्रॅकची गुणवत्ता, सिग्नल यंत्रणा, सुरक्षितता आणि वेगाची काटेकोर तपासणी करण्यात आली. चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरल्याने नगर-दौंड टप्पा लवकरच पूर्ण क्षमतेने रेल्वे वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
उपमुख्य अभियंता (बांधकाम) सागर चौधरी यांनी सांगितले की, सारोळा-विसापूर डबल लाईन द्रुतगती रेल्वेमार्गाच्या सहाव्या टप्प्याची हायस्पीड चाचणी यशस्वी झाली आहे. या प्रकल्पामुळे नगर जिल्ह्यातील रेल्वे सेवेत आमूलाग्र बदल होणार असून प्रवाशांना अधिक वेगवान आणि वेळेवर सेवा मिळेल.

मनमाड-नगर-दौंड रेल्वेमार्ग हा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेगाड्यांचा विलंब कमी होणार असून उद्योग, व्यापार आणि मालवाहतुकीलाही मोठा फायदा होणार आहे. तसेच भविष्यात या मार्गावर नवीन सुपरफास्ट रेल्वेगाड्या सुरू करण्याचाही मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्या

Vishakha Raut : ठाकरे गटाच्या माजी महापौर विशाखा राऊत यांना झटका;...

0
मुंबई | Mumbai शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत (Vishakha Raut) यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. पालघर...